६५ गावांच्या घशाला कोरड
By Admin | Updated: January 30, 2015 00:49 IST2015-01-30T00:47:20+5:302015-01-30T00:49:36+5:30
बालाजी आडसूळ , कळंब प्रतीवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा प्रश्न तालुक्यातील ९१ पैकी ६५ गावांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होतो़ या गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी

६५ गावांच्या घशाला कोरड
बालाजी आडसूळ , कळंब
प्रतीवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा प्रश्न तालुक्यातील ९१ पैकी ६५ गावांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होतो़ या गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलस्वराज्य, भारत निर्माणसह इतर विविध योजना राबविण्यात आल्या आहेत़ या योजनांवर कोट्यवधी रूपयांचा खर्च करूनही अनेक योजना कुचकामी ठरल्याने पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे़
गत काही वर्षापासून तालुका व परिसरात अल्पप्रमाणात पाऊस होत आहे़ परिणामी नोव्हेंबर, डिसेंबर पासून काही गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे़ तालुक्यातील ६५ गावांमध्ये ही समस्या मोठी आहे़ प्रतीवर्षी विविध योजनांचे आराखडे तयार होतात, योजना राबविल्या जातात़ शिवाय अधिग्रहणे, टँकरवर होणारा खर्च हा वेगळाच आहे़ पाणीटंचाई सोडविण्यासाठी या गावांमध्ये जलस्वराज्य, जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, पंचायत समितीमार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत़ किमान गरजा कार्यक्रम, तात्पुरत्या नळ योजना, नळयोजना विशेष दुरूस्ती, अधिग्रहण, टँकर, पुरक पाणीपुरवठा योजनाही राबविण्यात आल्या आहेत़ यानंतर आता तालुक्यात राष्ट्रीय पेयजलचे वारे जोमात वाहत आहे़ यात २२ गावात जलस्वराज्य, ३३ गावात भारत निर्माण तर लोहटापूर्वसह सहा गावात कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ यावर लाखो, कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे़ मात्र, पाईपलाईन, तांत्रिक दोष, जलस्त्रोत अटण्यासह इतर कारणांनी यातील अनेक योजना कुचकामी ठरल्या आहेत़ त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केल्यानंतरही या गावांकडून अधिग्रहण, टँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत.
लोहटा पूर्व येथे जीवन प्राधिकरण मार्फत सहा कोटीपेक्षा अधिकची रक्कम खर्च करून लोहटा पूर्व, लोहटा पश्चिम, जवळा खुर्द, करंजकल्ला, एकूरका या गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले़ योजना पूर्णत्वास येवून वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्याप या गावांना तहान भागलेली नाही़ सध्या ही योजना मृतावस्थेत असून, पाईपलाईनलाही गंज चढला आहे़ त्यामुळे कोट्यवधी रूपयांचा खर्च कशासाठी ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे़
बाभळगाव, पिंप्री (शि़), कोथळा, देवधनोरा, वाघोली, भोसा, कन्हेरवाडी, भाटशिरपुरा, गौर, नागझरवाडी, मस्सा, देवळाली, शिंगोली, बरमाचीवाडी, बांगरवाडी, उपळाई, वडगाव (शि़), लासरा, ताडगाव, रायगव्हाण, खोंदला, शेळका धानोरा, कोथळवाडी, रांजणी, घारगाव, जायफळ, बहूला, येरमाळा, बारातेवाडी, बोर्डा, माळकरंजा, सातेफळ, शिराढोण या गावात भारत निर्माण योजना राबविण्यात आली आहे़