चार वर्षांत ६५ मातामृत्यू

By Admin | Updated: July 10, 2014 00:58 IST2014-07-10T00:20:08+5:302014-07-10T00:58:45+5:30

संजय तिपाले , बीड माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनपातळीवर विविध उपाययोजना सुरु आहेत; पण दारिद्र्य, अज्ञान व सुविधांअभावी आजही जिल्ह्यातील ५ टक्के महिलांची प्रसुती घरीच होते़

65 maternal deaths in four years | चार वर्षांत ६५ मातामृत्यू

चार वर्षांत ६५ मातामृत्यू

संजय तिपाले , बीड
माता व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनपातळीवर विविध उपाययोजना सुरु आहेत; पण दारिद्र्य, अज्ञान व सुविधांअभावी आजही जिल्ह्यातील ५ टक्के महिलांची प्रसुती घरीच होते़ गरोदरपणात सात हजारांहून अधिक महिलांना हाती कोयता घेऊन राबावे लागते़ मागील चार वर्षांत अशा तब्बल ६५ मातांना आपला जीव गमवावा लागला़
सुरक्षित मातृत्वावरच बाळाचे आरोग्य अवलंबून असते त्यामुळे गरोदरपणात महिलांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असते़ आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीतूनच ही बाब उघड झाली आहे़ चालू वर्षी मातामृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी खाली आले आहे. मात्र, बालमृत्यूचा आलेख काही कमी व्हायचे नाव घेत नाही. राज्यापेक्षाही बीड जिल्ह्यातील अर्भकमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. बालमृत्यूची राज्याची टक्केवारी २५ तर बीडची ३५ इतकी आहे. मातांनी गरोदरपणात काळजी घेतली तर मातामृत्यू व बालमृत्यू टळू शकतील. हे दोन्ही विषय परस्परपुरक आहेत. त्यामुळे संभाव्य धोके ओळखून उपाययोजना करणेच उचित असल्याचे जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले.
अशी घ्यावी काळजी...
सुरक्षित मातृत्वासाठी मातांनी पोषक आहार घ्यावा, आरोग्य केंद्रात नावनोंदणी करुन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, किमान पाचवेळा आरोग्य तपासणी करावी, लोहगोळ्या घ्याव्यात, प्रसुती दवाखान्यातच करावी व दोन बाळांच्या मध्ये तीन वर्षांचे अंतर ठेवावे, असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन डोईफोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
इच्छेविरुद्ध मातृत्व
१२ आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो; परंतु प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान तपासणी प्रतिबंधक कायद्याचा बागुलबुवा करुन गर्भपात करणे टाळले जाते. अनेकदा इच्छा नसतानाही अनेकीना मातृत्व स्वीकारावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेद्रांमध्येही गर्भपात केले जात नाहीत. त्यामुळे महिलांना त्यांच्या अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे.
मातामृत्यूमध्ये बालविवाह ही सर्वात गंभीर समस्या आहे. अल्पवयातच मातृत्व लादले गेल्याने माता व बाळ या दोघांच्याही जिवाला धोका होऊ शकतो. बालविवाहाचे राज्याचे प्रमाण १७.६ तर बीडचे प्रमाण तब्बल ३४.२ टक्के इतके आहे. जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची संख्या मोठी आहे. जितके कोयते अधिक तितकी मजुरी अधिक त्यामुळे कमी वयातच मुला- मुलींचे विवाह लावले जातात़ जवळपास सात हजार महिला गरोदरपणातच ऊसतोडीसारखे कष्टाचे काम करतात़
चार वर्षांतील मातामृत्यू
वर्षे मातामृत्यू
२०११-१२ २६
२०१२-१३ २६
२०१३-१४ १२
१०१४-१५ ०१

Web Title: 65 maternal deaths in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.