जाधववाडीत ६५ लाखांची उलाढाल ठप्प
By Admin | Updated: July 13, 2016 00:41 IST2016-07-13T00:22:39+5:302016-07-13T00:41:54+5:30
औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत.

जाधववाडीत ६५ लाखांची उलाढाल ठप्प
औरंगाबाद : अडत शेतकऱ्यांऐवजी खरेदीदाराकडून घ्यावी, असे अध्यादेश राज्य सरकारने काढले आहेत. याविरोधात मागील शुक्रवारपासून जाधववाडीतील धान्य व फळ-भाजीपाल्याचे अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी, दैनंदिन ६५ लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे. या बंदचा फटका शेतकऱ्यांपासून ते हमालांपर्यंत सर्वांना बसत आहे.
जाधववाडीत दररोज सुमारे ८०० पेक्षा अधिक शेतकरी फळे-पालेभाज्या घेऊन येत. मात्र, अडत्यांच्या बंदमुळे मंगळवारी पहाटे सुमारे १०० ते १५० शेतकरी माल घेऊन आले होते. मागील काही दिवसांत पडलेल्या संततधारेमुळे शेतांमध्ये पालेभाज्या खराब झाल्या. त्याचा परिणाम अडत बाजारात पाहण्यास मिळाला. फळभाज्यांची आवक ६० टक्क्यांनी घटली होती. जो शेतीमाल आला, तो उतरून घेण्यास अडत्यांनी नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांनी परिसरातच उघड्यावर पालेभाजी विक्रीला सुरुवात केली. आवक कमी असल्याने पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाले होते. शहरातील अन्य भाजी मंडईतील विक्रेते फळभाज्या खरेदीसाठी आले तर त्यांना शेतकऱ्यांना रोख रक्कम द्यावी लागत होती. जुनी उधारी फेडायची व अडत्याकडून नवीन पालेभाज्या उधारीवर घेऊन जाण्याची प्रथा येथे असल्याने अनेक विके्रत्यांनी कमी पैसे सोबत आणले होते. शेतकरी उधारीवर माल देत नसल्याने या विक्रेत्यांनी कमी पालेभाज्या खरेदी केल्या. कारभारी सोनवणे या शेतकऱ्याने सांगितले की, आवक कमी असल्याने टोमॅटोला चांगला भाव मिळाला. पहिले १३ कॅरेट विक्री झाले; पण शिल्लक ७ कॅरेट विकताना दमछाक झाली. आबासाहेब काथार या शेतकऱ्याने सांगितले की, विक्रेत्यांना अडत्याकडून उधारीवर माल घेण्याची सवय असल्याने आम्हाला रोख रक्कम देण्याची त्यांची मानसिकता नाही. कैलास जोगदंडे या शेतकऱ्याने सांगितले की, रोख रक्कम देताना पालेभाज्यांचे भाव विक्रेते पाडून मागत होते. नंतर कमी-जास्त करून आम्ही पालेभाज्या विक्री केल्या.
धान्याच्या अडत बाजारातही बेमुदत बंदचा मंगळवारी चौथा दिवस होता. हर्राशी झाली नाही. सर्व अडत व्यापारी गटा-गटाने चर्चा करताना दिसून आले. बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ म्हणाले की, अडत व्यवहार बंद असल्याने फळ बाजारात दैनंदिन ४० लाख व धान्य अडत बाजारात २५ लाख असे ६५ लाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.