६५ अतिक्रमणांवर हतोडा
By Admin | Updated: March 17, 2015 00:40 IST2015-03-17T00:16:37+5:302015-03-17T00:40:54+5:30
जालना : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या भिंत परिसरातील ६५ अतिक्रमणे अखेर नगरपालिका व सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी हटविली

६५ अतिक्रमणांवर हतोडा
जालना : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या भिंत परिसरातील ६५ अतिक्रमणे अखेर नगरपालिका व सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी हटविली. तब्बल सहा तास अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू होते.
ही अतिक्रमणे हटविण्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांच्यासमवेत नगरपालिका मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे व अन्य अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. मात्र या ठिकाणी १९८७ पूर्वीपासून लोक राहतात, त्यामुळे अतिक्रमणे हटवू नयेत, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. १३ मार्च रोजी अतिक्रमण हटाव पथक या भागात आल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आम्हाला अतिक्रमण हटविण्यास संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र काही लोकांनी विरोध दर्शविला होता.
या पार्श्वभूमीवर रविवारपर्यंतची मुदत पालिकेने दिली होती. परंतु नागरिकांनी अतिक्रमणे स्वत:हून न हटविल्याने सोमवारी सकाळी १० वाजता नगरपालिका व पोलिसांचे संयुक्त पथक सर्व ताफ्यानिशी या भागात पोहोचले.
दोन जेसीबी, आठ ट्रॅक्टर तसेच दीडशे कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह या पथकाने अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला.
काही घरे, हॉटेल्स, टपऱ्या, दुकाने अशी एकूण ६५ अतिक्रमणे हटविण्यात आली. दुपारी ४ वाजेपर्यंत हे काम सुरू होते. यावेळी पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, उपनिरीक्षक श्रीमंतराव ठोंबरे, मोहिते, अर्जुन झावरे, गावडे, भंडारे, स्वच्छता निरीक्षक देवानंद पाटील, संजय खर्डेकर, जाधव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)