६४ कोटी रुपये पडून
By Admin | Updated: July 18, 2014 01:52 IST2014-07-18T01:19:40+5:302014-07-18T01:52:59+5:30
औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला.

६४ कोटी रुपये पडून
औरंगाबाद : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी आर्थिक मदत देण्याच्या हेतूने राज्य सरकारने मराठवाड्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी ९७० कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, एवढे दिवस होऊनही त्यातील ६४ कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरावर वाटपाअभावी पडून आहे. त्यामुळे विभागातील हजारो शेतकरी अजूनही गारपिटीच्या मदतीपासून वंचित आहेत.
या परिस्थितीत गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केले. कोरडवाहूसाठी १० हजार, बागायती १५ हजार आणि फळबागांसाठी २५ हजार रुपये हेक्टरी मदत देण्याचे सरकारने जाहीर केले.
त्यानुसार मराठवाड्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ९९४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी ९७० कोटी रुपयांचा निधी २५ मार्च ते १३ मे या काळात तीन टप्प्यांत मराठवाड्यास प्राप्त झाला. मात्र, प्रशासनाकडून अतिशय कासवगतीने त्याचे वाटप सुरू आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जिल्हा प्रशासनाकडून ही मदत जमा करावी, अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारने प्रशासनाला दिल्या होत्या. तरीही आतापर्यंत केवळ ९०६ कोटी रुपयांचेच वाटप झाले
आहे.
अद्याप ६४ कोटी रुपयांचा निधी वाटपाअभावी पडून आहे.
आतापर्यंत एकूण १५ लाख ४० हजार शेतकऱ्यांनाच ही मदत मिळाली आहे. आणखी सव्वालाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद, अशा सर्वच जिल्हाधिकाऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात गारपीटग्रस्तांसाठीचा निधी पडून आहे.
साडेआठ लाख हेक्टरवरील नुकसान
मराठवाड्यात फेबु्रवारीअखेरीस अवकाळी पावसाने थैमान घातले. ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे ८ लाख ५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाले.