आश्रमशाळेतील ६०० शिक्षक, कर्मचारी वेतनापासून वंचित
By Admin | Updated: September 6, 2014 00:27 IST2014-09-06T00:20:18+5:302014-09-06T00:27:43+5:30
नांदेड : आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय किनवटतंर्गत असलेल्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

आश्रमशाळेतील ६०० शिक्षक, कर्मचारी वेतनापासून वंचित
नांदेड : आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय किनवटतंर्गत असलेल्या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. ऐन सणासुदीच्या काळात वेतन नसल्याने कर्मचारी अस्वस्थ आहेत.
जिल्ह्यात २३ अनुदानित आदिवासी आश्रमशाळा आहेत. याअंतर्गत ५९८ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. तीन महिने झाले की, एकदाच पगार मिळतो. शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे पगार मात्र नियमित होतात. या आश्रमशाळेवर किनवटच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्पाचे नियंत्रण आहे. प्रकल्प कार्यालयात चौकशी केली असता, आॅनलाईनचे कारण सांगितले जाते. अनियमित पगार शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहे. मागील सात ते आठ महिन्यांपासून संबंधित हा प्रकार सहन करीत आहेत. नागपंचमी, रक्षाबंधन, पोळा, रमजान ईद आदी सणासुदीच्या दिवसातही कर्मचारी वेतनापासून वंचित राहिले. काही कर्मचाऱ्यांनी बँकेकडून कर्ज, गृहकर्ज घेतल्यामुळे हप्ते वेळेवर फेडता येत नाही. चोहोबाजूंनी कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. यापुढे दसरा, दीपावली सण येत आहेत. या दरम्यानही प्रकल्प कार्यालय वेळेवर देईल, याची खात्री नसल्याने शिक्षक, कर्मचाऱ्यांनी १७ सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, शिक्षणमंत्री, सचिव, आयुक्त आदींनाही पाठविण्यात आल्या. (प्रतिनिधी)