६० स्पीडब्रेकर बांधले
By Admin | Updated: July 2, 2014 00:30 IST2014-07-01T23:54:45+5:302014-07-02T00:30:21+5:30
बिलोली : नांदेड-हैदराबाद महामार्गावरील ‘गाव तिथे स्पीडब्रेकर’ ची मोहीम वाहनधारकांसाठी धोकादायक बनली.

६० स्पीडब्रेकर बांधले
बिलोली : नांदेड-हैदराबाद महामार्गावरील ‘गाव तिथे स्पीडब्रेकर’ ची मोहीम वाहनधारकांसाठी धोकादायक बनली असून जिल्हास्तरीय समितीची कोणतीही परवानगी नसताना बेधडक स्पीडब्रेकर बांधण्यात आल्याचे पुढे आले़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना असताना महामार्गावर जवळपास ६० स्पीडब्रेकर निर्माण करून खाजगी कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची दिशाभूल केली आहे़
नांदेड-नरसी-बिलोली-तेलंगणा सीमा हा राज्य महामार्ग क्रमांक २२५ असून मागच्या दहा वर्षापासून खाजगी कंपनीकडे टोलवसुली पद्धतीनुसार २० वर्षाकरिता करारबद्ध आहे़ नांदेड-नरसीपर्यंत दुभाजक असून चौपदरीकरण पूर्ण करण्यात आले आहे़ दरम्यान, नरसी - बिलोली-तेलंगणा सीमा या ३० कि़ मी़ चे रुंदीकरण सध्या सुरू आहे़ बिलोली शहरात चौपदरी दुभाजकसह तर शहराबाहेर त्रिपदरीचा प्रस्ताव आहे़
मार्गाचे रुंदीकरण खाजगी कंपनीकडून करण्यात येत असले तरी देखरेख व निरीक्षणाचे कर्र्तव्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते़ बिलोली तालुका पातळीवर सा़ बां़ चे उपविभागीय कार्यालय आहे़ पण नरसी-बिलोली-तेलंगणा सीमा मार्गाचे देखरेख मुखेडच्या उपविभागीय कार्यालयाकडे सोपविण्यात आले़ सद्यस्थितीत महामार्गावर रुंदीकरण जोरात सुरू आहे़ नव्याने झालेल्या गुळगुळीत रस्त्यामुळे वाहनचालकांची गती व वाहतुकही प्रचंड वाढली आहे़ परिणामी मागच्या दोन महिन्यात अपघाताचे प्रमाण वाढले़ अपघात होत आहेत म्हणून गाव सुरू होण्यापूर्वी दोन्ही दिशेला स्पीडब्रेकर टाकण्यात आले़ स्पीडब्रेकरची उंची, दिशादर्शक फलक (साठ मीटरपूर्वी), रात्रीच्या वेळी स्पीडब्रेकर दिसण्यासाठी पांढरे रेडीयम, रेडीयम फलक आदी काहीच नाहीत़ प्रामुख्याने महामार्गावर स्पीडब्रेकर निर्माण करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत़ परंतु नांदेड-नरसी-बिलोली-तेलंगणा सीमापर्यंत दुतर्फा जवळपास ६० स्पीडब्रेकरची अचानक निर्मिती करण्यात आली़ दर पाच कि़ मी़ अंतरावर स्पीडब्रेकर झाल्याने वाहनधारक, बसचालकांची चांगलीच पंचाईत झाली असून स्पीडब्रेकर धोकादायक बनले आहेत़
सतत स्पीडब्रेकर झाल्याने वाहन कसे चालवावे हा प्रश्न बनला असून वाहनधारकांनी टोल भरूनही महामार्ग मोकळा राहिलेला नाही़ मुख्यत: मागच्या काळात झालेल्या अपघातात वाहनचालक दारूडे होते़ त्यामुळे अपघात वाढले असे पुढे आले़ दारू पिवून वाहनच ालवणाऱ्यांची तपासणी कुठेच केली जात नाही़ अपघातात महामंडळाच्या गाड्यांचे समावेश नसून खाजगी वाहनधारकांनीच अपघात केले आहेत़ स्पीडब्रेकर धोकादायक बनल्याने अपघात टाळण्यासाठी अन्य सर्व्हिस मार्गाचा अवलंब व्हावा, अशी मागणी आहे़(वार्ताहर)
सर्वोच्य न्यायालयाचे निर्देश
महामार्गावर स्पीडब्रेकर टाकण्यासाठी सन २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत़ प्रत्येक जिल्हा पातळीवर समिती असून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता सदस्य असून स्पीडब्रेकर बाबत निवेदन आल्यानंतर समिती अहवाल मागवते व स्पीडब्रेकरसाठी परवानगी देते़ पण नांदेड-हैदराबाद या महामार्गावर दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंत ये-जा करणारी वाहतूक प्रचंड असताना नियमबाह्य स्पीडब्रेकर टाकून वाहनचालक व मालकांची कुचंबना झाली आहे़