६० जणांना मोफत काशी विश्वनाथांचे दर्शन
By Admin | Updated: November 5, 2014 00:58 IST2014-11-05T00:30:04+5:302014-11-05T00:58:18+5:30
राम तत्तापूरे ,अहमदपूर समाजातील अनेकांना आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे काशी विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही.

६० जणांना मोफत काशी विश्वनाथांचे दर्शन
राम तत्तापूरे ,अहमदपूर
समाजातील अनेकांना आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे काशी विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी जाता येत नाही. काशी विश्वनाथांचे दर्शन व्हावे आणि आपल्या धार्मिक वृत्तीच्या पत्नीचे स्मरण कायम रहावे, या हेतूने येथील एका सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षकाने ६० जणांना मोफत काशी विश्वनाथांचे दर्शन घडविण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला असून, या दर्शनासाठी भाविक रविवारी रवाना झाले आहेत.
या अनोख्या उपक्रमाची सध्या शहरात कुतूहलाने चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर पैके यांचे पत्नीवर असलेल्या प्रेमाची या उपक्रमातून साक्ष मिळत आहे. अहमदपूर शहरातील सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक सांब काशिनाथअप्पा पैके यांच्या पत्नी शकुंतला यांचे दीड वर्षापूर्वी अकाली निधन झाले. हे दाम्पत्य धार्मिक वृत्तीचे असून, त्यांच्यावर वीरमठ संस्थानचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे संस्कार आहेत.
या पैके कुटुंबियाने चारवेळा भारत भ्रमण केले आहे. हे भारत भ्रमण करण्यात आले असले, तरी तीर्थयात्रा करण्याची शकुंतला पैके यांची इच्छा होती. मात्र काळाने त्यांना हिरावून नेल्याने ती इच्छा अपूर्णच राहिली. आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण व्हावी, या हेतूने सांब पैके यांनी दहा दिवसांची तीर्थयात्रा करण्याची योजना आखली. यात ६० जणांना मोफत तीर्थक्षेत्राचेदर्शन घडविण्याचा त्यांनी मानस आखला. त्यानुसार रविवारी सकाळी येथील क्षिप्र गणेश मंदिरापासून तीर्थयात्रेसाठी भाविक रवाना झाले आहेत. या भाविकांना जबलपूर, चित्रकुट, वारानसी, शिवकाशी, अलाहाबाद, उज्जैन, महाकल्लेश्वर, ओंकारेश्वर, शेगाव आदी देव-देवतांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. या तीर्थयात्रेत पैके यांच्या चार मुली तसेच नातेवाईक यांच्यासोबत बालपणातील निवडक मित्र सहभागी झाले आहेत. या सर्व भाविकांचा खर्च पैके हे स्वत: करणार आहेत.