६० लाख लिटर दारू
By Admin | Updated: December 30, 2016 22:20 IST2016-12-30T22:18:56+5:302016-12-30T22:20:52+5:30
बीड : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

६० लाख लिटर दारू
बीड : मावळत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षांचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात दारुचा महापूर वाहणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस रात्रभर गस्तीवर राहणार आहेत. मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार आहे.
खास ‘थर्टी फर्स्ट’साठी बार, हॉटेल पहाटेपर्यंत उघडी राहणार असून शौकिनांना यामुळे दिलासा मिळाला आहे. नववर्षाच्या स्वागताला मित्रांची मैफल रंगणार आहे. यानिमित्ताने अनेकांनी हॉटेल, बारमध्ये जंगी मेजवान्यांचे आयोजन केले आहे. दरम्यान, उत्सवावर विरजण पडणाऱ्या अप्रिय घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवस आधीपासूनच ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या कारवाया सुरु झाल्या आहेत. गुरुवारी ४० तर शुक्रवारी पन्नासहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता फटाके फोडून जल्लोष होणार आहे. यावेळी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही यासाठी पोलीस पुरेपूर काळजी घेणार आहेत. ध्वनिक्षेपकांचा आवाज मोजण्यासाठी ४० यंत्रे उपलब्ध आहेत. शांतता प्रवण भागात ५० व इतर ठिकाणी ६० डेसिबलपेक्षा अधिक ध्वनीचे क्षेपण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांच्या तपासणीसाठी दोन ब्रेथ अॅनालायझर यंत्र आहेत. पोलीस कर्मचारी रात्रभर गस्तीवर राहणार असून आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात ६० लाख लिटर दारुची विक्री झाली होती. यंदाही तेवढेच मद्य विक्रीसाठी आल्याचे उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)