बायजीपुऱ्याला ६० फुटांचा रस्ता

By Admin | Updated: December 18, 2015 23:50 IST2015-12-18T23:44:32+5:302015-12-18T23:50:27+5:30

औरंगाबाद : विकास आराखड्यातील नियोजित रस्ता मोकळा करण्यासाठी शुक्रवारी बायजीपुऱ्यात सक्तीची भूसंपादन मोहीम राबविण्यात आली.

60 feet road to Bijay Pur | बायजीपुऱ्याला ६० फुटांचा रस्ता

बायजीपुऱ्याला ६० फुटांचा रस्ता

औरंगाबाद : विकास आराखड्यातील नियोजित रस्ता मोकळा करण्यासाठी शुक्रवारी बायजीपुऱ्यात सक्तीची भूसंपादन मोहीम राबविण्यात आली. रस्त्याआड येणाऱ्या सर्व १७ मालमत्ता बुलडोझरच्या साह्याने दिवसभरात जमीनदोस्त करण्यात आल्या. किरकोळ विरोध वगळता ही कारवाई शांततेत पार पडली. तहसील कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.
जालना रोडवरील एसएफएस शाळेसमोरून बायजीपुऱ्याकडे ६० फूट रुंद रस्ता जातो. परंतु अपेक्स रुग्णालयाच्या पुढे हा रस्ता मध्येच थांबलेला होता. तेथे रस्त्यात १७ मालमत्तांचा अडथळा होता. महानगरपालिकेने तहसील कार्यालयामार्फत भूसंपादनाची कारवाई केली होती. २००२ मध्ये प्रक्रिया पूर्ण झाली. मनपाने २००७ साली भूसंपादनाचा मोबदलाही तहसील कार्यालाकडे जमा केला. परंतु मालमत्ताधारक जागेचा ताबा देण्यास तयार
(पान १ वरून)
झाले नाहीत. त्यामुळे हा रस्ता रखडला होता. शेवटी आज याठिकाणी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविली.
तहसील कार्यालय आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईसाठी आज दुपारी १२ वाजता येथे पोहोचले, पण त्याआधीच नागरिकांनी घरे रिकामी केली होती. त्यामुळे लगेचच जेसीबीच्या साह्याने कारवाईला सुरुवात करण्यात आली. रस्त्याआड येणारी एकेक घरे भुईसपाट करण्यात आली. दिवसभरात सर्व १७ मालमत्ता पाडून रस्ता मोकळा करण्यात आला. सुमारे १२५ मीटर अंतरात या मालमत्ता पसरलेल्या होत्या. ही घरे हटविल्यामुळे आता एसएफएससमोरून निघणारा रस्ता सरळ समोर बायजीपुऱ्यातील दुसऱ्या रस्त्याला मिळाला आहे. ताबा पावती देण्यावरून किरकोळ विरोध वगळता कारवाई शांततेत पार पडली. दोन-चार घरे स्लॅबची तर उर्वरित घरे पत्र्यांची असल्यामुळे जेसीबीने सफाया करण्यात आला.
कारवाईला दोन तास उशीर
मनपा आणि तहसील कार्यालयाने कारवाईसाठी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेचा मुहूर्त काढला होता. परंतु प्रत्यक्षात कारवाई सुरू होण्यासाठी दोन तास उशीर झाला. नियोजित वेळेप्रमाणे या भागात सकाळीच तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. खबरदारी म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे पथकही दाखल झाले. रस्त्यालगतच्या खांबांवरील वीजपुरवठा बंद करण्यात आला. मनपा आणि तहसीलचे कर्मचारी ११.३० वाजता दाखल झाले. परंतु पाडापाडीसाठी जेसीबी आणि बुलडोझर मात्र आले नव्हते. ते पोहोचल्यानंतर दुपारी १२.३० वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली.
 

Web Title: 60 feet road to Bijay Pur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.