अवैध वाळू वाहतूक करणारी ६ वाहने पकडली
By Admin | Updated: June 25, 2014 00:41 IST2014-06-25T00:15:54+5:302014-06-25T00:41:06+5:30
वसमत/कळमनुरी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया वसमत व कळमनुरी येथे सुरू झाली आहे.

अवैध वाळू वाहतूक करणारी ६ वाहने पकडली
वसमत/कळमनुरी : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू नेणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया वसमत व कळमनुरी येथे सुरू झाली आहे. रविवारी वसमत येथे ३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्यानंतर मंगळवारी पुन्हा २ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर कळमनुरी तालुक्यात ४ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
वसमत : नांदेड भागातून वाळू घेऊन येणाऱ्या ट्रकची धरपकड मोहीम आरटीओने सुरू केली आहे. वसमत येथे सलग दोन दिवसांत चार वाहनांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर या महिन्यात केवळ वाळू वाहतुकदारांकडून तब्बल चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती मोटर वाहन निरीक्षक विकास सुर्यवंशी यांनी दिली.
वसमत येथे रविवारी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तीन वाहनांकडून दंड वसूल केला होता. मंगळवारीही मोटर वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी, जावेद पठाण आदींचे पथक वसमत येथे दाखल झाले. या पथकाने एम. एच. ३८ डी २६२ या ओव्हरलोड ट्रककडून ३५ हजार ६०० रुपयांचा दंड तर एम. एच. १६ क्यु ५७०३ या वाहनाकडून १५ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल केला. अधिकारी आल्याचे वृत्त समजताच नांदेड- परभणी मार्गावर धावणारे वाळूचे ट्रक आज गायब झाले होते. मोटर वाहन निरीक्षक सूर्यवंशी यांची भेट घेतली असता त्यांनी नांदेडकडून हिंगोली जिल्ह्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर वाळू घेऊन येतात. यात १४ ते १८ टनापर्यंत वाळू घेऊन येणारे ओव्हरलोड ट्रक आहेत. ओव्हरलोड वाहतूक करणे गैरकायदेशिर असल्याने अशा वाहनांविरोधात मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. वसमत, वारंगा, कळमनुरी या भागात वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून या महिन्यात चार लाखांचा दंड वसूल केल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. या पथकात विकास सूर्यवंशी, कॉ. जावेद पठाण आदी कर्मचारी सहभागी आहेत.
कळमनुरी : अवैध वाळूचा उपसा करणारे चार ट्रॅक्टर तहसीलच्या पथकाने २३ जून रोजी पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती नायब तहसीलदार के.एम. विरकुंवर यांनी दिली.
सावंगी (भू) येथील गुलाब गंगाधर भूतनर यांचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैध वाळू घेऊन कळमनुरीकडे येत असताना उमरा पाटीजवळ तहसीलच्या पथकाने पकडले.
शिवणी खुर्द येथील नारायण विठ्ठल जाधव यांचे ट्रॅक्टर क्र. एम. एच. ३८ बी. ४१७२ हे कळमनुरी येथे हातमाली येथील भागवत रमेश भोयर यांचे एम. एच. ३८ बी. १२०५ हे मसोड फाट्याजवळ, शेख इफ्तेखार यांचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर सालेगावहून कळमनुरीकडे येत असताना कळमनुरी येथे पकडण्यात आले. प्रत्येक ट्रॅक्टर मालकांकडून ६ हजार ३०० रुपये असा एकूण २५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात मंडळ अधिकारी ए. एम. सुळे, जी. एस. पाखरे, आर. एस. क्षीरसागर यांचा समावेश होता. अवैध वाळू उपसा व गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)