निविदा प्रक्रियेला लागतील ६ महिने

By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:26:21+5:302014-07-23T00:41:46+5:30

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस.टी. महामंडळाने मार्चमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या.

6 months for the tender process | निविदा प्रक्रियेला लागतील ६ महिने

निविदा प्रक्रियेला लागतील ६ महिने

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस.टी. महामंडळाने मार्चमध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यास चार कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला; परंतु आगामी विधानसभा निवडणूक आणि निवडणुकीपूर्वी लागणाऱ्या आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास ६ ते ७ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१५ मध्येच अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी निविदेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या दहा वर्षांत औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पर्यटनाची राजधानी औरंगाबादेत किमान बसस्थानक तरी चांगले असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.
बसस्थानक बांधण्यासाठी याआधीही निविदा मागविण्यात आल्या होत्या; परंतु आलेल्या निविदेतून महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्यामुळे त्यावेळी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यानंतर बीओटी तत्त्वावर अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी २३ मार्च ते २३ मे २०१४ दरम्यान अद्ययावत बसस्थानक बांधण्यासाठी फेरनिविदा काढण्यात आली.
यावेळी ११ कंत्राटदारांनी निविदा खरेदी केल्या. मात्र, प्रत्यक्षात केवळ ४ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या. आता आलेल्या निविदांमधील टेक्निकल आणि कमर्शियल बाबींची पाहणी केल्यानंतर अंतिम निर्णयास महामंडळाकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे. महामंडळाच्या मंजुरीनंतर राज्य शासनाचीही त्यास मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर निविदेवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
असुविधांकडे लक्ष द्यावे
निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्यास मोठा कालावधी लागणार असल्यामुळे स्थानकातील असुविधांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. स्थानकातील कर्मचारीही असुविधांमुळे त्रस्त आहेत.
आॅगस्टमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क आॅर्डर मिळण्यास जवळपास सहा ते सात महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानकासाठी प्रवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
15.52कोटी रुपयांची निविदा
2,200स्क्वेअर मीटर जागेत बसस्थानक
3,500स्क्वेअर मीटर जागेत कमर्शियल कॉम्प्लेक्स

Web Title: 6 months for the tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.