६ कोटींचा प्लॅन उद्ध्वस्त
By Admin | Updated: October 27, 2016 00:56 IST2016-10-27T00:42:13+5:302016-10-27T00:56:09+5:30
औरंगाबाद : दिवाळीचे औचित्य साधून शहरात भूमाफिया सरसावले असून, स्वस्तामध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्याचा धंदा काहींनी सुरू केला आहे

६ कोटींचा प्लॅन उद्ध्वस्त
औरंगाबाद : दिवाळीचे औचित्य साधून शहरात भूमाफिया सरसावले असून, स्वस्तामध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्याचा धंदा काहींनी सुरू केला आहे. एकच प्लॉट बाँडपेपरवर दोन नागरिकांना विकण्याचा डाव आखलेल्या भूमाफियांचा डबलगेम बुधवारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी उद्ध्वस्त केला.
जळगाव रोडपासून अवघ्या १ कि. मी. अंतरावर हर्सूल परिसरातील गट नं. ७६/१ मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला मिळाली. भूमाफियांनी २० बाय ३० चे ४५ प्लॉट पाडले. या लेआऊटला दोन वेगवेगळे नाव देण्यात आले होते. एका जाहिरात पत्रकावर आनंदनगर तर दुसऱ्या पत्रकावर जय जिजाऊनगर असे नाव देण्यात आले होते. या प्लॉटिंगमध्ये एकच प्लॉट बाँडपेपरवर दोन नागरिकांना विकण्याचा हा डाव होता.
मनपा उपायुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंता एस. एस. कुलकर्णी यांनी अनधिकृत प्लॉटिंग निष्कासित करण्यासाठी रीतसर फाईल तयार केली. उपायुक्त आणि आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजता अनधिकृत प्लॉटिंगवर बुलडोझर फिरविण्यात आला. ही कारवाई थांबविण्यासाठी भूमाफियांनी शर्थीचे प्रयत्न केले. कुलकर्णी यांनी या प्रयत्नांना फोल ठरविले.