५८ टक्के पेरणी
By Admin | Updated: July 24, 2014 00:29 IST2014-07-23T23:58:54+5:302014-07-24T00:29:39+5:30
हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीस मागील आठवड्यापासून प्रारंभ झाला आहे.
५८ टक्के पेरणी
हिंगोली : महिनाभराच्या उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीस मागील आठवड्यापासून प्रारंभ झाला आहे. यंदा अधिकच उशीर झाल्याने सरसगट शेतकरी जोमाने पेरणीला लागल्यामुळे २२ जुलैपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५६ टक्के पेरणी आटोपली आहे. प्रामुख्याने त्यात कापसाला नाकारून बळीराजाने अपेक्षेनुरूप सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. आगामी चार दिवसांत पावसाने उघाड दिल्यास आठवडाभरात पेरण्या पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन होते; परंतु उशिरा मान्सून दाखल झाल्याने उत्पादकांचे आणि कृषी विभागाचे गणित बिघडले. गतवर्षी २२ जुनपर्यंत पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा अगदी उलट स्थिती असल्याने पन्नास टक्के क्षेत्रावर देखील पेरण्या झालेल्या नाहीत. मुख्यत्वेकरून यंदा कृषी विभागाने निश्चित केलेल्या क्षेत्रापेक्षाही कापसाचे क्षेत्र अधिक घसरण्याची चिन्हे आहेत. इतर पिकांच्या तुलनेने लवकर लागवड होणाऱ्या कापसाला नाकारल्याने पेरणीस विलंब होत आहे. आजघडीला ९४ हजार पैकी ५६ हजार ९८४ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. सद्य:स्थितीत २८ पैकी ८ हजार ९३१ हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा झाला असला तरी तुरीचे क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पेरणीला विलंब झाल्याने मूग आणि उडदाऐवजी तूर घेण्याकडे उत्पादकांचा कल वाढला आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यात चारा समस्येने पशुपालक हैराण असताना खरीप ज्वारीचा पेरा कमी आहे. एकूण ४४ हजार ८९० पैकी ६ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. बाजरी, मका, भूईमुग, तीळ, काराळ, सुर्यफुल ही पिके हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. ही सर्व पिके मिळून ३ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी ठरविले होते. प्र्रामुख्याने निश्चित केलेल्या ६६० पेक्षा तिप्पटीने म्हणजे १ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झाली आहे; पण तीळ, काराळ आणि सूर्यफूल मिळून २०० हेक्टर क्षेत्रावरही देखील पेरणी झालेली नाही. भाताच्या बाबतीतही कृषी विभागाचे नियोजन चुकल्याने २ हजार २४० पैकी अत्यंत नगण्य क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. हळदीची ६ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अटोपली आहे. सुरूवातीला कृषी विभागाने १८ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाचे आणि १६ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी होण्याची शक्यता वर्तविली होती; परंतु पाऊस महिनाभराच्या उशिराने दाखल झाल्याने यो दोन्ही पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला. परिणामी उत्पादकांनी मुगाची २ हजार ६२५ तर उडदाची २ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली आहे. वरील सर्व पिकांची गोळाबेरीज केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सोयाबीनचे क्षेत्र वाढणार हे निश्चित असताना अपेक्षेपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. यंदा नियोजित २ लाख पैकी १ लाख ४ हजार ४७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विशेषत: सर्वच तालुक्यात सोयाबीनचा पेरा होत असून कापसाबरोबर तृणधान्याच्या कमी होत जाणाऱ्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होत आहे. शिवाय सोयाबीन वगळता गळीत धान्यातील सर्व पिकांचे कमी झालेले क्षेत्र सोयाबीनकडे वळले आहेत. आगामी चार दिवसांत उघडीप दिल्यास आठवड्यात पेरण्या आटोपण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अशी घ्या खबरदारी...
पुरेशा ओलीवर पेरणी करावी, प्रामुख्याने सोयाबीनचे बियाणे खोलावर जावू नये, याची काळजी घ्यावी, उगवणशक्ती तपासलेले सोयाबीनचे बियाणे पेरावे, पेरणीला उशीर झाल्यामुळे अंतरपिके अधिक घ्यावीत, पाऊसमान कमी असल्यामुळे रूंद सरी वरंब्या पद्धतीने पेरणी करावी, मूग आणि उडदाचे पीक शक्यतो घेवू नयेत, शिफारशीपेक्षा २५ ते ३० टक्के खत कमी वापरावा, कमी ओलावा असल्यामुळे जमिनीतील पाणी अधिक शोषून घेत असलेले तण लवकर काढावे असा सल्ला कळमनुरी तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी दिला आहे.
जिल्ह्यात यंदा ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पेरणीचे केले आहे नियोजन.
सरसगट शेतकरी जोमाने पेरणीला लागल्यामुळे २२ जुलैपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात झाली ५६ टक्के पेरणी.
जिल्ह्यात इतर पिकांपेक्षा सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे १ लाख हेक्टर क्षेत्रावर.