बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन ५७ हजारांचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:36 IST2017-01-13T00:34:18+5:302017-01-13T00:36:07+5:30
लातूर : अधिक सोने देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांना अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे बनावट बिस्कीट देत त्यांच्याकडील ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली़

बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन ५७ हजारांचे दागिने लांबविले
लातूर : अधिक सोने देण्याचे आमिष दाखवून दोन महिलांना अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे बनावट बिस्कीट देत त्यांच्याकडील ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरूवारी घडली़ याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लातूर शहरातील शोभा हरिदास पवार (रा़अयोध्या नगर, कव्हा रोड)यांच्यासह अन्य एका महिलेला अज्ञात दोघांनी अधिक सोने देण्याचे आमिष दाखविले़ दोघांकडून मिळणाऱ्या दुप्पट सोन्याच्या आमिषाला शोभा पवार आणि अन्य एक महिला बळी पडल्या़ ठरल्याप्रमाणे गुरूवारी दुपारी हनुमान चौक ते गंजगोलाई रस्त्याकडेला ते अज्ञात दोघे थांबले होते़ दरम्यान, या दोघी महिलांनी त्यांच्या जवळ जात आपल्या गळ्यातील व जवळील दागिने त्यांच्याकडे सुपूर्द केले़ त्या बदल्यात त्या चोरट्यांनी या दोन महिलांना सोन्याचे बिस्कीट दिले़ त्यानंतर हे दोघे काही वेळात पसार झाले़ आपल्याला दुप्पट सोने मिळाले आहे, या भावनेने शोभा पवार व त्यांच्या सोबत आलेल्या एका महिलेने या सोन्याच्या बिस्कीटा विषयी सराफाकडे जावून अधिक चौकशी केली़ त्यानंतर अज्ञात दोघा चोरट्यांनी दिलेले हे सोन्याचे बिस्कीट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन महिलांना अचानक घाम फुटला आणि यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळाले़ याप्रकरणी तातडीने गांधी चौक पोलीस ठाणे गाठत शोभा हरिदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा विरोधात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़