५७ ग्रा.पं.ना ‘रेडकार्ड’!
By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:26:38+5:302014-06-30T00:37:12+5:30
संजय तिपाले , बीड जिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़

५७ ग्रा.पं.ना ‘रेडकार्ड’!
संजय तिपाले , बीड
जिल्ह्यातील तब्बल ३१४ गावांमधील ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच तहान भागवावी लागते़ त्यापैकी ५७ ग्रामपंचायती तीव्र जोखमीच्या असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या ग्रामपंचायतींना ‘रेडकार्ड’ बजावले आहे़
जून महिना संपला तरी अद्याप पुरेसा पाऊस नाही़ त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करत आहे़ दुसरीकडे उपलब्ध पाण्याचे काही स्त्रोत दूषित आहेत़ त्यामुळे नाईलाजाने सामान्यांवर दूषित पाण्यावरच तहान भागविण्याची वेळ आली आहे़ मे महिन्यात आरोग्य विभागाने ग्रामीण भागात ११३ ठिकाणी पाणी नमुने घेतले़ त्यापैकी ३१४ नमूने दूषित असल्याचे आढळून आले़ त्याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे़
पाणी नमूने दूषित आढळलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़
काय आहेत कार्ड?
एखाद्या गावातील ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोक दूषित पाणी पित असतील तर अशा ग्रामपंचायतींना तीव्रजोखमीचे गाव समजले जाते़ त्यांना रेडकार्ड दिले जाते़ जिल्ह्यात ५७ ग्रा़पं़ ना रेडकार्ड दिले आहे़ ३१ ते ६० टक्के नागरिक दूषित पाणी पित असतील तर मध्यम जोखमीचे गाव मानले जाते़ अशा ग्रा़पं़ ना पिवळे कार्ड दिले जाते़ ० ते ३० टक्के लोक दूषित पाण्यावर तहान भागवत असतील तर अशी गावे सौम्य जोखीम या गटात मोडतात़ त्यांना हिरवे कार्ड दिले जाते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी दिली़ या कार्डवर उपाययोजनांची माहिती असते़
वैयक्तिक काळजी महत्त्वाची
जिल्हा प्रजनन व बालस्वास्थ्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, पाणी दूषित असले तरी ते शुद्ध करुन पिण्यासाठी वैयक्तिक उपाययोजना कराव्यात़ गढूळ पाण्यात तुरटी फिरवावी़ १० लिटर पाण्यात पाच थेंब लिक्विड क्लोरिन टाकावे़ गरोदर माता, वृद्ध व एक वर्षांपर्यंतच्या बाळांना पाणी उकळून व गाळूनच द्यावे असा सल्लाही त्यांनी दिला़
जलसुरक्षकांना सूचना
ग्रामीण भागातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत़ जल सुरक्षकांना याबाबत सूचना दिल्या असून पाणीनमुने नियमित तपासण्यास सांगितले आहे़ ग्रामपंचायतींनीही योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया भारत निर्मल अभियानचे जिल कार्यक्रम व्यवस्थापक एस़ बी़ वाघमारे यांनी दिली़
कार्यशाळांतून उपाययोजना
पाणी गुणवत्तेच्या संदर्भाने नुकतीच जिल्हास्तरीय कार्यशाळा घेतली़ त्यानंतर आता १ जुलैपासून तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात येतील़ ५७ ग्रा़पं़ ना लालकार्ड दिले आहेत़ त्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेतला जाईल, असे पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी सांगितले़
ग्रा.पं.ने करावयाच्या उपाययोजना...!
दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींनी शुद्धीकरणासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ़ पी़ के़ पिंगळे यांनी दिल्या़ पाणी वाहते करावे, विंधनविहिरींमध्ये ब्लिचींग पावडर टाकावे, दुरुस्ती कामे करावीत, स्त्रोतांच्या ५० फूट अंतरापर्यंतचा परिसर स्वच्छ ठेवावा, तेथे पाणी साचू देऊ नये अशी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले़
दूषित पाण्याने होणारे आजार
दूषित पाणी शरीराला घातक आहे़ गॅस्ट्रो, कॉलरा, काविळ यासारखे जलजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते़ यात एखाद्या रुग्णाचा मृत्यू होण्याचीही भीती असते़
तालुका निहाय असे बजावले कार्ड
तालुकालाल कार्डपिवळे कार्ड हिरवे कार्ड
अंबाजोगाई१४५५ ३१
आष्टी ००१९ १०३
बीड०९५३ १११
धारुर०० १९ ३६
गेवराई१२९३ २७
केज००२३ ९०
माजलगाव१४५३ २३
परळी००३९ ५२
पाटोदा ०७१९ ३४
शिरुर०१३९ १२
वडवणी०० १३ २३
एकूण ५७४२५ ५४२