५४३ मूर्तीचे विसर्जन; उत्सवाची सांगता
By Admin | Updated: October 6, 2014 00:12 IST2014-10-06T00:01:32+5:302014-10-06T00:12:02+5:30
हिंगोली : लाडक्या गणरायास निरोप दिल्यानंतर लगेचच भक्तांनी दुर्गा महोत्सवाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्हाभरात ५४३ दुर्गा देवी मुर्तीची स्थापना करण्यात आली होती.

५४३ मूर्तीचे विसर्जन; उत्सवाची सांगता
हिंगोली : लाडक्या गणरायास निरोप दिल्यानंतर लगेचच भक्तांनी दुर्गा महोत्सवाची तयारी केली होती. त्यानुसार जिल्हाभरात ५४३ दुर्गा देवी मुर्तीची स्थापना करण्यात आली होती. नवरात्रात अखंड सेवा केल्यानंतर शनिवारी भाविकांनी दुर्गा मातेस भावपूर्ण निरोप दिला. ‘डीजे’ऐवजी यंदा बहुतांश मंडळांनी पारंपरिक मिरवणूकीला प्राधान्य दिले.
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मंडळांकडून विशेष तयारी करण्यात आली होती. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक चांगल्या पद्धतीने सजावट करण्यात आली होती. हिंगोली शहरातील सर्वच मंडळांनी आकर्षक मखराची उभारणी केली होती. शिवाय मुर्तीही निरनिराळ्या ठिकाणांहून मागवल्या होत्या; परंतु यंदा मूर्तीस्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत वाद्यांचा आवाज कानी पडला नाही. सुरूवातीला बँण्ड वाद्यानेच मिरवणूक काढून मुर्ती स्थापना केली. अगदी शेवटच्या दिवशीही तेच चित्र पहावयास मिळाले. पहिल्यांदाच डीजेचा वापर करण्यात आला नाही. पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीवर अधिक भर देण्यात आला होता. बहुतांश मंडळांनी बँण्डलाच पसंती दिली होती. काही मंडळांनी टाळ, मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली. हिंगोली शहरातील ३७ मंडळांकडून उत्साहात मिरवणूक काढली. बहुतांश मंडळांनी मूर्तींचे जलेश्वर तलावात विसर्जन केले. दुसरीकडे औंढा येथे १६ मंडळांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले. वसमत, सेनगाव, कळमनुरी, शिरडशहापूर येथेही अगदी शांततेत मिरवणुका निघाल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
३६ मूर्तींची स्थापना
हिंगोली शहरात ३६ मंडळांकडून दुर्गा मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाभरात यंदा केवळ १० मंडळांनीच शारदा देवीच्या मुर्तीची स्थापना केली आहे. हिंगोलीत इंदिरा गांधी चौकातील त्रिशूल नवदुर्गा मंडळ, राजहंस दूर्गा मंडळ, रिसाला बाजार, गाडीपुरा, जवाहर रोड, गोलंदाज गल्लीत आकर्षक मूर्ती पहावयास मिळाल्या. सवाद्य मिरवणूक काढून मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
डांगे याचे व्याख्यान
हिंगोली : शहरातील बियाणी नगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त शेषाद्री डांगे यांचे व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. विठ्ठल रोडगे, शिलचंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डांगे यांनी स्वयंसेवक कसा असावा? याचे विवेचन केले. देशात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना निर्भयपणे वावरण्याची, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. मात्र काही अराष्ट्रीय शक्ती त्याला खोडा घालत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय चारित्राची माणसे घडविण्याची खरी गरज आहे. शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या प्रमाणे स्वयंसेवकांमार्फत सुराज्य स्थापनेसाठी प्रयत्न केले जात असल्याचे डांगे म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित महासंगम कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही केले.
विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले. (प्रतिनिधी)