५४ टक्के औरंगाबादकरांनी फटाके फोडणे यंदा टाळले
By Admin | Updated: October 30, 2014 00:29 IST2014-10-30T00:03:39+5:302014-10-30T00:29:51+5:30
अशोक कारके, औरंगाबाद दिवाळी म्हटली की ग्रामीण भागात ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाय म्हशी कोणाच्या?’ असा आवाज कानी पडतो.

५४ टक्के औरंगाबादकरांनी फटाके फोडणे यंदा टाळले
अशोक कारके, औरंगाबाद
दिवाळी म्हटली की ग्रामीण भागात ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाय म्हशी कोणाच्या?’ असा आवाज कानी पडतो. शहरात विविध प्रकारच्या फटाक्यांचा आवाज आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी नजरेस पडते; पण हळूहळू यामध्ये बदल होताना दिसत आहे. ५४ टक्के औरंगाबादकरांनी फटाके फोडणे टाळल्याचे लोकमतने २७ आॅक्टोबर रोजी केलेल्या सर्वेक्षणात दिसून
आले.
होळी आणि दिवाळी हे दोन सण उत्साहाने साजरे केले जातात. या सणांची लहान मुले, तरुण- तरुणी आणि नागरिक आतुरतेने वाट पाहतात. सण जवळ येताच त्याच्या तयारीची लगबग बाजारपेठेत आणि ग्राहकांमध्ये सुरू होते. काही वर्षांपूर्वी फटाके फोडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.
ग्रामीण भागात फटाके फोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याउलट शहरी भागात काही जण वेळेअभावी, तर काही जण पर्यावरणाच्या जागरूकतेने फटाके फोडणे टाळत आहेत. एकीकडे प्रदूषणामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे, तर दुसरीकडे प्रदूषण निर्माण करणारे सण उत्साहात साजरे केले जात आहेत. गेल्या दोन- तीन वर्षांत पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे दिवाळीमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सणामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. हा विषय घेऊन विविध सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये बदल दिसून येत आहे. सर्वेक्षणात चार प्रश्न बहुपर्यायी आणि एक फटाके फोडण्याविषयी विचारण्यात आला होता. त्यामध्ये फटाके फोडणे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत ८८ टक्के नागरिकांनी म्हटले आहे. फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे ९८ टक्के नागरिकांनी मान्य केले, तसेच दिवाळीमध्ये फटाके फोडल्याचेही ४६ टक्के नागरिकांनी मान्य केले आहे.