पोलिसांसाठी आणखी ५३२ घरे

By Admin | Updated: June 23, 2016 01:31 IST2016-06-23T00:52:54+5:302016-06-23T01:31:13+5:30

औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि शहर पोलिसांसाठी आणखी ५३२ घरांचा प्रकल्प बांधण्यात येत आहे.

532 houses for police | पोलिसांसाठी आणखी ५३२ घरे

पोलिसांसाठी आणखी ५३२ घरे


औरंगाबाद : पोलीस आयुक्तालयासाठी नवीन इमारत आणि शहर पोलिसांसाठी आणखी ५३२ घरांचा प्रकल्प बांधण्यात येत आहे. त्यासाठी १६० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. शिवाय सिटीचौक पोलीस ठाण्याची ४० वर्षे जुनी इमारत पाडून तेथे मॉडेल पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्र्रलंबित आहेत. अर्ध्याहून अधिक पोलिसांना घरेच नाहीत. जुन्या पोलीस कॉलनीतील घरे राहण्यायोग्य नाहीत. त्यामुळे मोडकळीस आलेली जुनी पोलीस वसाहत पाडून तेथे पोलिसांचे क्वॉर्टर्स उभारण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयांकडून शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या अनुषंगाने राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) के. एल. बिष्णोई हे आज बुधवारी औरंगाबादेत आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात अमितेशकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. या बैठकीविषयी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाची जुनी इमारत पाडून तेथे नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीला यापूर्वीच शासनाने मंजुरी दिलेली आहे. आयुक्तालयाच्या इमारतीसाठी २० कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली आहे. शिवाय पोलीस आयुक्तालयाच्या मागील जुनी वसाहत पाडून तेथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्यात येत आहेत.
शहर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ५३२ घरे बांधण्यात येत आहेत. या घरांसाठी अतिरिक्त १४० कोेटी रुपयांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. पुढील महिन्यात या घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. तर आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पोलीस वसाहतीच्या कामाचा शुभारंभ होईल. सिडको एन-१० पोलीस कॉलनीमधील शंभरहून अधिक जुन्या घरांना भूतबंगल्याचे स्वरूप आले आहे. या घरांची नियमित दुरुस्ती न झाल्याने घरांची ही अवस्था झाल्याचे मानले जाते.
पोलीस आयुक्तालयाला दोन वर्षात नवीन अद्ययावत तीन मजली इमारत प्राप्त होणार आहे. दोन महिन्यांत आयुक्तालयाच्या इमारत बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
आयुक्तालयाची इमारत सुंदर आणि आकर्षक असणार आहे. तळमजला आणि वर तीन मजले, असे स्वरूप या इमारतीचे असेल. आयुक्तालयाच्या मागील रिकाम्या जागेवर ही इमारत उभारली जात आहे.

Web Title: 532 houses for police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.