जिल्ह्यात ५२ टँकर सुरू
By Admin | Updated: May 14, 2014 00:53 IST2014-05-14T00:49:15+5:302014-05-14T00:53:29+5:30
उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्याअधिक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता.

जिल्ह्यात ५२ टँकर सुरू
उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्याअधिक जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे जलस्त्रोतांची पातळी अपेक्षेच्या प्रमाणात कमीच वाढली. त्यामुळे सध्या ४ तालुक्यांमध्ये टंचाई अधिक तीव्र बनली आहे. परिणामी टँकरची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. सदरील आकडा ५२ वर जावून ठेपला आहे. तर ११६ जलस्त्रोताचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा आणि उस्मानाबाद या तालुक्यामध्ये पावसाने सरासरी गाठली. मात्र भूम, परंडा, वाशी आणि कळंब या चार तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. त्यामुळे या तालुक्यामध्ये असणारे प्रमुख प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. तसेच विहीर, बोअर यासारख्या जलस्त्रोतांची पाणी पातळीही फारसी न उंचावल्यामुळे उन्हाळा सुरु होताच असे जलस्त्रोत कोरडे पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे संबंधित गावांमध्ये सध्या भीषण टंचाई निर्माण झाली आहे. भूम तालुक्यामध्ये सध्या सर्वाधिक २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वालवड सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात गावे टंचाईचा सामना करीत आहेत. भूम पाठोपाठ कळंब तालुक्यातही पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करु लागला आहे. १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही गावांमध्ये जलस्त्रोत अधिग्रहण करुन पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याठिकाणी ६४ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच वाशी तालुक्यातील टँरचा आकडा ६ वरुन ८ जाऊन ठेपला आहे. तर अधिग्रहणाची संख्या ७ इतकी झाली आहे. परंडा तालुक्यात टंचाईची तीव्रता कमी असली तरी ही संख्या भविष्यात वाढणार आहे. आजघडीला दोन टँकर आणि दोन जलस्त्रोतांचे अधिग्रहण करुन टंचाईग्रस्त गावांची तहान भागविली जात आहे. जिल्ह्यातील अधिग्रहणाची संख्या ११६ इतकी झाली असून, ५२ टँकर सुरु आहेत. (प्रतिनिधी) भूजल पातळीही खालावू लागली मागील दोन ते तीन वर्षापासून भूमसह परिसरात अत्यल्प पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणीसाठा उपसण्याची स्पर्धा लागली आहे. जलस्त्रोतांच्या पुनर्भरणाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय भूम तालुक्याची भूजल पातळी यावेळी झपाट्याने खालावू लागली आहे. त्यामुळेच या तालुक्यामध्ये जास्त टँकर लागत आहेत.