५२ प्रकल्प अद्यापही कोरडेच
By Admin | Updated: September 1, 2016 01:12 IST2016-09-01T00:53:40+5:302016-09-01T01:12:29+5:30
उस्मानाबाद : यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले असले तरी जिल्ह्यात आजवर अपेक्षित पाऊस झालेला नाही़ परिणामी जिल्ह्यातील २१६ प्रकल्पांपैकी तब्बल ५२ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़

५२ प्रकल्प अद्यापही कोरडेच
उस्मानाबाद : यंदा पावसाचे वेळेवर आगमन झाले असले तरी जिल्ह्यात आजवर अपेक्षित पाऊस झालेला नाही़ परिणामी जिल्ह्यातील २१६ प्रकल्पांपैकी तब्बल ५२ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़ तर ८६ प्रकल्पांमध्ये गाळयुक्त पाणीसाठा आहे़ तुळजापूर व मुरूम परिसरात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे केवळ १२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ तर ६ प्रकल्पाची पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या वर आहे़ प्रकल्पांची परिस्थिती, गावा-गावातील पाणीटंचाई आणि पावसाअभावी वाया जाणारी पिके पाहता सर्वांनाच मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे़ मात्र, आगामी काळात पाऊस झाला नाही तर जिल्हावासियांना यंदाही भीषण दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे़
सलग तीन-चार वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या जिल्हावासियांना यंदा वेळेत पाऊस आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता़ जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कमी-अधिक पडणारा पाऊस आॅगस्ट महिन्यात गायब झाला़ तब्बल महिनाभर जिल्ह्याच्या परिसरात पाऊस झाला नाही़ प्रारंभीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या पावसात जिल्ह्यातील केवळ १२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ ६ प्रकल्पांची पाणीपातळी ७५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे़ तर १२ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा आहे़ २६ ते ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा केवळ ९ प्रकल्पांमध्ये झाला आहे़ तर २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा ३९ प्रकल्पांमध्ये आहे़ तर तब्बल ८६ प्रकल्पात केवळ गाळयुक्त पाणीसाठा असून, ५२ प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत़
पाऊस पडू लागल्याने प्रशासनाने गावा-गावातील टँकर, अधिग्रहणे बंद केली होती़ परिणामी या गावातील, शहरांमधील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ त्यातच उपलब्ध पाण्याचा होणारा उपसा आणि पाऊस पडत नसल्याने पाणीसाठ्यात घट होवू लागली आहे़ जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांची परिस्थिती पाहता उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर प्रकल्प कोरडाठाक असून, तेरणा, वाघोली प्रकल्पात काही प्रमाणात गाळयुक्त पाणी आहे़ कळंब तालुक्यातील रायगव्हाण, परंडा तालुक्यातील खंडेश्वर हे प्रकल्पही कोरडेठाक आहेत़ भूम तालुक्यातील संगमेश्वर प्रकल्पात केवळ ०़२२१ दलघमी पाणीसाठा आहे़ बाणगंगा प्रकल्पात ०़३९५ दलघमी, रामगंगा प्रकल्पात ०़००२ दलघमी पाणीसाठा आहे़ परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी, व साकत हे प्रकल्प जोत्याखाली असून, या प्रकल्पांमध्ये गाळयुक्त पाणी आहे़ तुळजापूर तालुक्यातील कुरनूर प्रकल्पात ११़२०० दलघमी, हरणी प्रकल्पात ८़०९० दलघमी, खंडाळा प्रकल्पात ३़८४७ दलघमी, उमरगा तालुक्यातील जकापूर प्रकल्पात २़२१३ दलघमी, तुरोरी प्रकल्पात ०़३७८ दलघमी तर बेन्नीतुरा प्रकल्पात ७़४५२ दलघमी पाणीसाठा आहे़
केवळ ११़१४ टक्के उपयुक्त पाणी
४जिल्ह्यातील २१६ प्रकल्पांपैकी ७८ प्रकल्पांमध्ये केवळ ७२़५८५ दलघमी म्हणजे ११़१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे़ मागील आठवड्यात ही परिस्थिती ७३़६१ दलघमी म्हणजे ११़३० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता़ एका आठवड्यात यातील ०़१६ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे़ मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ७़५६ दलघमी म्हणजे १़१६ टक्के पाणीसाठा होता़ गतवर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती बऱ्यापैकी आहे़ मात्र, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे़
पूर्ण क्षमतेने भरले १२ प्रकल्प
४जिल्ह्यातील केवळ १२ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत़ यात परंडा तालुक्यातील तिंत्रज, तुळजापूर तालुक्यातील व्होर्टी लघू पाझर तलाव, कुनसावळी, सलगरा मड्डी, व्होर्टी साठवण तलाव एक, सुरटा सा़त़दोन, जळकोट, आलीयाबाद, हंगरगाळ नळ, खंडाळा, उमरगा तालुक्यातील भिकारसांगवी, कोराळा हे १२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत़