जिल्हा परिषदेत ५२ सदस्य नवखे !
By Admin | Updated: February 25, 2017 00:29 IST2017-02-25T00:27:53+5:302017-02-25T00:29:11+5:30
बीड जिल्हा परिषदेच्या नवनिर्र्वाचित पदाधिकाऱ्यांत ५२ सदस्य नवखे असून ते पहिल्यांदाच राजकारणाचे धडे गिरवणार आहेत.

जिल्हा परिषदेत ५२ सदस्य नवखे !
संजय तिपाले बीड
जिल्हा परिषदेच्या नवनिर्र्वाचित पदाधिकाऱ्यांत ५२ सदस्य नवखे असून ते पहिल्यांदाच राजकारणाचे धडे गिरवणार आहेत. सोबतच ८ जुन्या पदाधिकाऱ्यांना सदस्यपद कायम ठेवण्यात यश आले. आता सभापतीपदी नव्या-जुन्यांपैकी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे आता उत्कंठावर्धक ठरत आहे.
६० सदस्यांच्या बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहाने आतापर्यत दीड डझन नेते घडविले आहेत. जि.प. मधून राजकीय ‘श्रीगणेशा’ केलेल्या या सर्वांनी पुढे लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद गाठली. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या सभागृहास विशेष महत्त्व आहे. पाच वर्षांपूर्वी जि.प. चे एकूण संख्याबळ ५९ होते. यावेळी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यात एकाची भर पडली आहे. नवीन ६० पैकी ८ सदस्यांच्या गाठीशी अनुभवाची शिदोरी आहे. राकॉचे विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, अनूसया सोळंके, सेनेचे युद्धजित पंडित, काकू- नाना आघाडीचे संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या जयश्री मस्के, काँग्रेसच्या आशा दौंड, भाजपच्या सविता गोल्हार यांचा यात समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे पाच वर्षांच्या कार्यकाळात यापैकी जयश्री मस्के व सविता गोल्हार वगळता इतर सहा जण ‘किंगपोस्ट’ राहिलेले आहेत. विजयसिंह पंडित यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तर आशा दौंड यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला. संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे, युद्धजित पंडित, अनूसया सोळंके यांनी सभापतीपदे भूषविली. हे सर्व पदाधिकारी आता नव्या ५२ सदस्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.
सोळंके अन् जिल्हा परिषद
पूर्वापार नाते
मिनी मंत्रालय व सोळंके घराण्याचे पिढ्यान्पिढ्यांचे नाते आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदरराव सोळंके १९६० च्या दशकामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र प्रकाश सोळंके हे देखील जि. प. मध्ये अपक्ष निवडून गेले होते. नंतर ते आमदार, मंत्री पदावर गेले. धैर्यशील सोळंके यांनी सभापतीपद भूषविलेले आहे. आता सोळंके कुटुंबातील दोन सदस्य जि.प. त पोहचले आहेत. मंगल प्रकाश सोळंके व जयसिंह सोळंके यांनी विक्रमी मतांसह विजयश्री खेचून आणली. जयसिंह यांच्या रूपाने सोळंके घराण्यातील तिसरी पिढी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली.