५२ गावांत साथीच्या आजारांचा उद्रेक
By Admin | Updated: October 31, 2014 00:36 IST2014-10-31T00:11:46+5:302014-10-31T00:36:13+5:30
बीड : केवळ धूर फवारणी करणे म्हणजे साथीच्या आजाराला प्रतिबंध असे होत नाही. यासाठी जाणीव जागृती बरोबरच साथ रोगाचा फैलाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील अबेटिंग करणे,

५२ गावांत साथीच्या आजारांचा उद्रेक
बीड : केवळ धूर फवारणी करणे म्हणजे साथीच्या आजाराला प्रतिबंध असे होत नाही. यासाठी जाणीव जागृती बरोबरच साथ रोगाचा फैलाव होण्यापूर्वी जिल्ह्यातील अबेटिंग करणे, स्वच्छतेसाठी उपक्रम राबविणे, आरोग्य यंत्रणा व जिल्हा हिवताप कार्यालय यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे. मात्र यापैकी कोणतीही उपाय योजना बीड जिल्हयातील अकरा तालुक्यांमध्ये झालेली नाही. याचाच परिणाम म्हणून जिल्हयात ५२ पेक्षा जास्त गावे तापीने फणफणलेले आहेत. साथ रोगांचा फैलाव झाल्यावर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. यामध्ये जिल्हयातील चार जणांचा डेंग्यू चिकुन गुनियाने बळी गेला आहे. जिल्हयातील साथीचे आजार व आरोग्य यंत्रणा यांचा घेतलेला आढावा़
अनिल महाजन ल्ल धारूर
तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी साथीचे आजार येऊ नयेत, यासाठी जाणीव जागृती करण्याचे काम होणे आवश्यक होते. मात्र तालुक्यातील आरोग्य विभागाने त्यावेळी दुर्लक्ष केले. परिणामी डेंग्यूमुळे तालुक्यातील सोनीमोहा येथील पुनम लहू तोंडे या ७ वर्ष वयाच्या चिमुकलीचा बळी गेला.
तालुक्यातील आरणवाडी, चोरंबा, घागरवडा, सोनीमोहा, धुनकवड, पहाडी पारगाव, काठेवाडी, कचरवाडी, सुरनवाडी, कारी आदी गावांमध्ये मागील अनेक दिवसापासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथ रोगांनी डोके वर काढले आहे.
तालुक्यातील दहा जणांच्या रक्ताचे नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. धारूर शहरासह अन्य ठिकाणच्या प्रा. आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे प्रभारी आहेत. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आसल्याचे पहावयास मिळत आहे.
भोगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देखील प्रभारी आहेत. यामुळे या भागात मागील दोन महिन्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी कसलीच उपायोजना झालेली नाही.
तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर दर्जेदार उपचार मिळत नसल्याने खाजगी दवाखान्यांचा सहारा गोर-गरीब रूग्णांना घ्यावा लागत आहे.
विलास भोसले ल्ल पाटोदा
तालुक्यातील सहा रूग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे दिले होते. यामध्ये सहा पैकी चार जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लागण झालेले रूग्ण करंजवन, येवलवाडी, पाटोदा व सोनेगांव येथील रहिवाशी आहेत.
पाटोदा तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये आमळनेर, वाहली, नायगाव व डोंगरकिन्हीचा समावेश आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. परंतु पाटोदा तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येक एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे़