५०५ जण तापाने फणफणले !
By Admin | Updated: August 8, 2014 00:33 IST2014-08-08T00:17:54+5:302014-08-08T00:33:00+5:30
कळंब : जिल्हाभरात साथीच्या आजाराने लहान बालकांसोबतच वृद्धही हैराण झाले आहेत. कन्हेरवाडी येथील चिकुन गुणियाची साथ आटोक्यात येते

५०५ जण तापाने फणफणले !
कळंब : जिल्हाभरात साथीच्या आजाराने लहान बालकांसोबतच वृद्धही हैराण झाले आहेत. कन्हेरवाडी येथील चिकुन गुणियाची साथ आटोक्यात येते ना येते तोच शेळका धानोरा येथील एका मुलीचा डेंग्युसदृश्य आजाराने गुरूवारी बळी घेतला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून बुधवारी दिवसभर सर्दी, खोकला आणि तापाचे तब्बल ५०५ रूग्ण दाखल झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून मिळाली.
कळंब तालुक्यात गत महिनाभरात एकही मोठा पाऊस झालेला नाही. शिवाय सततच्या ढगाळ हवामानामुळे पुरेसा सूर्यप्रकाशही राहिलेला नाही. त्यामुळे वातावरण कोंदट बनले असून डासांची उत्पत्तीही वाढली आहे. स्थानिक ग्रामपंचायतींकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच आता साथीच्या आराने डोके वर काढले आहे. कन्हेरवाडी येथे तीन-चार दिवसांपूर्वीच चिकुन गुनियाचा उद्रेक झाला होता. अनेक रूग्ण या आजाराने त्रस्त झाले आहेत. असे असतानाच गुरूवारी शेळका धानोरा येथे डेंग्यूसदृश्य आजाराने पूजा किसण पांचाळ या पंधरा वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. मंगळवारी सदर मुलीला ताप आला होता. लागलीच उपचारासाठी तिला एका खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले. परंतु, बुधवारी तिच्या अजारात वाढ झाल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिचा मृत्यु झाला.
दरम्यान, दिवसागणिक साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या रूग्णांची संख्या अधिक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तालुुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी ५०५ बाह्य रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्रात १४१, ईटकूर १०४, येरमाळा १०८, दहिफळ ७१, मोहा ४५ तर मंगरूळ केंद्रात ३६ बाह्य रूग्णांची नोंद झाली आहे. (वार्ताहर)
कन्हेरवाडी येथे सोमवारपासून चिकुन गुणियाची साथ गुरूवारी आटोक्यात आली आहे. ३३ रूग्णांव्यतिरिक्त अन्य एकही नवीन रूग्ण आढळून आला नसल्याने ही साथ आटोक्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. असे असले तरी आणखी तीन दिवस डॉक्टरांचे पथक गावामध्ये तैनात असणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
साथीच्या आजाराची लागण होवू नये, यासाठी डासांचे निर्मुलन करणे फार गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळवा, असे आवाहन डॉ. पुरूषोत्तम पाटील यांनी केले. तसेच जास्त पाणीसाठा करू नये, नाल्या व परिसराची साफसफाई करावी, असेही ते म्हणाले.