५०० शिक्षक धडकले जिल्हा परिषदेवर
By Admin | Updated: April 28, 2015 00:31 IST2015-04-28T00:10:39+5:302015-04-28T00:31:30+5:30
बीड : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा शासननिर्णय मागे घ्यावा, अतिरिक्त शिक्षक वर्षभरपासून वेतनाविना आहेत

५०० शिक्षक धडकले जिल्हा परिषदेवर
बीड : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा शासननिर्णय मागे घ्यावा, अतिरिक्त शिक्षक वर्षभरपासून वेतनाविना आहेत. त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पहावे या मागणीसाठी पाचशेवर शिक्षक सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेवर धडकले.
जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त नसतानाही ९२६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीद्वारे बीडमध्ये आले. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा आकडा हजाराच्या घरात गेला. सेवाज्येष्ठता, बिंदूमनामावली यास फाटा देत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करुन मूळ ठिकाणी पाठवावे असे आदेश गुरुवारी राज्याच्या शिक्षण विभागाने काढले होते.
सोमवारी पाचशेवर शिक्षक कन्या शाळेतील जि.प. शिक्षण विभागात दाखल झाले. तेथे कार्यमुक्तीचा आदेश मागे घेण्यासाठी काय- काय करता येईल? यावर सविस्तर चर्चा झाली. शासनादेश मागे घ्यावा, या मागणीसाठी ५०० शिक्षकांचा जमाव कन्या शाळेतून जिल्हा परिषदेत पायी आला. शहर ठाण्याचे निरीक्षक मारुती पंडित हे फौजफाट्यासह तेथे पाहोचले. त्यांनी शिक्षकांना दालनाबाहेर काढले. जमाव पाहता दंगलनियंत्रण पथकालाही पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी सीईओंना भेटण्यासाठी शिक्षकांच्या शिष्टमंडळास परवानगी दिली. प्रत्येक तालुक्यातील एक असे ११ शिक्षक ननावरे यांना भेटले.
पाठपुरावा सुरु
सीईओ नामदेव ननावरे यांनी शिष्टमंडळास सांगितले की, हा प्रश्न मंत्रालयीन स्तरावरील आहे. आज शिक्षक संघटनेसोबत शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली, मात्र त्या काय झाले ? हे सांगता येणार नाही. शिक्षकांबद्दल सहानुभूती आहे; परंतु शासनाच्या सूचनेप्रमाणेच काम करावे लागेल. प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
५०० शिक्षकांचा जत्था जि.प. वर धडकला मात्र, या शिक्षकांनी कुठल्याही शिक्षक संघटनेचा आधार घेतला नाही. एकत्रितपणे सर्वजण शांततेत आले होते. सीईओंना दिलेल्या निवेदनात मंगळवारपासून कुटुंबियांसमवेत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, सीईओ ननावरे यांनी शिक्षकांची बाजू ऐकून घेत त्यांना शांत केले. त्यानंतर शिक्षकांनी नमते घेतले अन् काही वेळेतच मंगळवारी आंदोलन करणार नाहीत, असे लेखी दिले.
शिक्षकांनी खचू नये
४जि. प. शिक्षण सभापती बजरंग सोनवणे म्हणाले, अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही. संचमान्यता, समायोजन, पदोन्नती प्रक्रिया राबवून प्रश्न मार्गी लावू. शिक्षकांनी खचून जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.