कपिलधार यात्रेसाठी ५०० पोलीस
By Admin | Updated: November 4, 2014 01:38 IST2014-11-04T00:34:04+5:302014-11-04T01:38:30+5:30
बीड : तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील यात्रेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे़ आठ लाख भाविकांची यात्रेला उपस्थिती असणार आहे़ तीन दिवस चालणारा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी

कपिलधार यात्रेसाठी ५०० पोलीस
बीड : तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथील यात्रेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे़ आठ लाख भाविकांची यात्रेला उपस्थिती असणार आहे़ तीन दिवस चालणारा महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़ सोमवारी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी कपिलधार येथे सुरक्षेचा आढावा घेतला़
राज्यभरातून ४५ पेक्षा जास्त दिंड्या बुधवारी श्री मन्मथस्वामी यांच्या पावनभूमीत आगमन करणार आहेत़ आंध्रप्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून भाविक कपिलधार येथे श्री मन्मथस्वामींच्या दर्शनासाठी येतात़ सोमवारपासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे़ पुढील दोन दिवसात येथे आठ लाख भाविक येणार असल्याचे येथील शिवशंकर महाराज चौंडे यांनी सांगितले़ आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पाचशेच्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ कपिलधार क्षेत्रावर जाण्यासाठी दोन वेगवेगळे मार्ग आहेत़ एक मार्ग बीडकडून तर दुसरा मांजरसुबामार्गे आहे़ यामुळे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या मार्गावर बंदोबस्त ठेवलेला आहे़ येथील सुरक्षेचा आढावा अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी घेतला़ यावेळी पोलिस उपअधीक्षक ए़ पी़ कराडे, अभय डोंगरे, सहायक निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांची उपस्थिती होती़
वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या भाविकांना रांगेत मन्मथस्वामींच्या समाधीचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेसाठी बॅरिकेटस् उभारले आहेत़ महिलांसाठी वेगळी रांग करण्यात येत आहे़ आलेल्या प्रत्येक भाविकाला स्वामींचे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीच्या सर्व सदस्यांबरोबरच संयोजन समितीने योग्य ती काळजी घेतलेली आहे़ याशिवाय मंदिर परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण झाले आहे़ ठिकठिकाणी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलिस व संस्थांचे स्वंयसेवकांनी नियोजन केले आहे़
रिंगण सोहळा ठरणार मुख्य आकर्षण
वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या दिंड्या मांजरसुंबा मार्गावरून कपिलधार येथे बुधवारपर्यंत दाखल होत आहेत़ या दिंड्यांचा रिंगण सोहळा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार असून हा सोहळा यात्रेच्या प्रारंभीच होणार असल्याचे संयोजन समितीतील सदस्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)