सोयाबीनच्या साडेपाचशे तक्रारी दाखल !
By Admin | Updated: July 24, 2014 00:12 IST2014-07-23T23:56:25+5:302014-07-24T00:12:56+5:30
उस्मानाबाद : अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे पेरणीला विलंब झाला.

सोयाबीनच्या साडेपाचशे तक्रारी दाखल !
उस्मानाबाद : अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर पेरणीयोग्य पाऊस पडला. त्यामुळे पेरणीला विलंब झाला. नगदी पिके म्हणून ओळख असलेल्या उडीद आणि मूग या पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेला. त्यामुळे बहुतांश तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी कालावधीत काढणीस येणाऱ्या सोयाबीनच्या पेरणीवर भर दिला. शेतकऱ्यांनी मोठ्या गतीने पेरणी उरकली. पेरणी होऊन सहा ते आठ दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही बियाणे उगवत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या. अनेक नामांकित कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या माथी दर्जाहीन बियाणे मारले. दिवसेंदिवस तक्रारींची संख्या मोठ्या झपाट्याने वाढू लागली आहे. आजघडीला तक्रारींचा आकडा साडेपाचशेवर जाऊन ठेपला आहे. बियाणे न उगवल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्याही केली आहे. त्यामुळे आता तातडीने पंचनामे उरकून शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सव्वाशे बॅग सोयाबीन मातीत
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यात जवळपास वीस हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, अनेक भागात बियाणे उगवले नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. दरम्यान, तालुका कृषी कार्यालयात २३ जुलैपर्यंत बियाणांबाबतच्या ५४ तक्रारी दाखल झाल्या असून, यात एकूण १२० पिशव्या सोयाबीन बियाणाची उगवण झालेले नसल्याचे समोर आले आहे.
पावसाअभावी तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. उशिरा का होईना शेतकऱ्यांनी २० हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा केला. त्यात शेतकऱ्यांनी घरगुती बियाणाकडे कानाडोळा करुन नामांकीत कंपन्याच्या बियाण्याला सर्वाधिक पसंती देत ३० किलो वजनाची बियाणांची पिशवी २५०० रुपयाने खरेदी केली. बियाणाची पेरही झाली. परंतु, महिन्यानंतरही कंपनीचे बियाणे जमिनीतच राहिल्याने फवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. याबाबत तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांनी बियाणाची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी तुळजापूर तालुका कृषी कार्यालयात दाखल केल्या आहेत. ु१२० पिशव्या बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. उगवण न झालेल्या सोयाबीन क्षेत्राचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
चार दिवसांमध्ये ९४ प्लॉटचे पंचनामे
कळंब : खरीप हंगामातील सर्वाधिक पेरा झालेल्या कळंब तालुक्यात सोयाबीन न उगवल्याच्या शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या असून, उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसांपासून संबंधित क्षेत्राचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या २१६ तक्रारींपैकी ९४ शेतकऱ्यांच्या सोयाबीन प्लॉटचे पंचनामे उरकण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी एम.आर. मोरे यांनी दिली.
कळंब तालुक्यात मागील चार वर्षात सोयाबीनच्या क्षेत्रात चारपटीने वाढ झालेली आहे. तालुक्यातील खरिपाखालील सरासरी ८० हजार हेक्टरपैकी जवळपास अर्ध्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होत असल्याने कळंब तालुका हा प्रमुख सोयाबीन उत्पादक भाग बनला आहे. गतवर्षी तालुक्यात ३३ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. यावर्षी सोयाबीनचा ४३ हजार हेक्टर एवढा विक्रमी पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार तालुक्यात उशिरा का होईना; झालेल्या पेरणीत सोयाबीनचा प्रत्यक्षात मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते घेऊन पेरलेल्या सोयाबीनची उगवण होत नसल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास येवू लागले आहेत.
पंचनाम्यांना हवी गती
तालुक्यातील विविध भागातून सोयाबीनची उगवण न झाल्याच्या एकूण २१६ तक्रारी पंचायत समितीच्या कृषी विस्तार कार्यालयात व तालुका कृषी कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या. अजूनही शेतकऱ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोहा, खामसवाडी, हळदगाव, खेर्डा, बोर्डा, शेळका धानोरा आदी गावातील ९४ शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार सोयाबीनच्या न उगवलेल्या क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. (वार्ताहर)
विमा भरण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी
ईट : अत्यल्प पाऊस, त्यातच सोयाबीन पिकाची उगवण झाली नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आता आर्थिक आधार शोधण्यास सुरुवात केली असून, यासाठीच यावर्षीच्या खरीप हंगामातील राष्ट्रीय पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठीही बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत असल्याचे दिसत आहे.
पाऊस पडेल या आशेवर बळीराजाने रासायनिक खते व संकरित बियाणाची खरेदी करुन खरीप पेरणीसाठी चाढ्यावर मूठ धरली. पण नंतर आजपर्यंतही र्ईट मंडळात अत्यंत अल्प पाऊस झाला आहे. पेरलेले सोयाबीनचे बियाणे पन्नास टक्के न उगवल्याने दुबार पेरणीचे संकटाबरोबरच शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकटही उभे आहे. उशिराच्या पावसामुळे कापूस पिकाचीही लागवड कमी झाली असून, तोही जोमदार दिसत नाही.
खरीप पिकाची अवस्था सद्यस्थितीत चांगली नसल्याने व अजूनही मोठा पाऊस न झाल्याने सध्या राष्ट्रीय खरीप पीक विमा योजनेतील खरीप पिकांचा विमा भरण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत गर्दी होत असल्याचे दिसत आहे. ईट शाखेंतर्गत गिरलगाव, घुलेवाडी, ज्योतिबाचीवाडी, निपाणी, माळेवाडी, लांजेश्वर, आंदरुड, पखरुड, ईट, नागेवाडी, झेंडेवाडी, पांढरेवाडी, घाटनांदूर, चांदवड आदी गावे असून, खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, सूर्यफूल या पिकाचा विमा मोठ्या प्रमाणावर उतरला जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावर्षीच्या खरीप हंगामातील खरीप पिकाचा विमा हप्ता भरण्याची मुदतही ३१ जुलैपर्यंत असल्याचे शाखाधिकारी जीवन कोकणे यांनी सांगितले.