पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

By Admin | Updated: March 20, 2017 23:49 IST2017-03-20T23:48:06+5:302017-03-20T23:49:27+5:30

उस्मानाबाद :मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला

50% water supply in five months | पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

पाच महिन्यात ५० टक्के पाणीउपसा

उस्मानाबाद : गतवर्षी सप्टेंबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने मागील चार वर्षाचा दुष्काळ धुवून काढला़ जिल्ह्यातील लहान-मोठ्या २१९ प्रकल्पांमध्ये १५ आॅक्टोबर २०१६ पर्यंत तब्बल ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ मात्र, मागील पाच महिन्याच्या कालावधीत यातील तब्बल ५० टक्के पाण्याचा उपसा झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे़
अवेळी आणि अपुऱ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे मागील चार वर्षे जिल्ह्यातील नागरिकांनी अभूतपूर्व पाणीटंचाईचा सामना केला़ दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता़ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले होते़ पाण्याअभावी खरिपासह रबी हंगामातील पिकेही हातची गेल्याने आणि वाढत्या कर्जामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले होते़ अशा परिस्थितीत मागील वर्षी सप्टेंबर अखेरीस परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातील बहुतांश सर्वच प्रकल्प तुडूंब भरले़ १५ आॅक्टोबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता़ परंडा तालुक्यातील सिना-कोळेगाव, माकणी येथील निम्न तेरणा, कळंब नजीकचा मांजरा प्रकल्पासह शहरी, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारे मध्यम, लघू प्रकल्प भरले होते़
सलग चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर सर्वच प्रकल्प तुडूंब भरल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला होता़ असे असले तरी मागील पाच महिन्याच्या काळात या प्रकल्पातून तब्बल ५० टक्के पाणीउपसा करण्यात आला आहे़ सद्यस्थितीत २१९ पैकी एक प्रकल्प कोरडा पडला असून, २० प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ ७० प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ८६ प्रकल्पात २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे़ ४० प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्के तर केवळ दोन प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांच्यावर उपयुक्त पाणीसाठा आहे़ वाढते उन आणि होणारा पाणीउपसा यामुळे प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे़ उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळातही प्रकल्पातून पाण्याचा उपसा होणार आहे़ ही बाब पाहता प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर होण्याची गरज आहे़ तसे नाही झाल्यासभविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: 50% water supply in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.