कॅशलेसच्या नावाखाली ५० हजाराला गंडा
By Admin | Updated: January 6, 2017 00:13 IST2017-01-06T00:12:04+5:302017-01-06T00:13:50+5:30
युसूफवडगाव : एका भामट्याने बँक अधिकारी असल्याचे भासवत शेतकऱ्याला ५० हजार रुपयांना गंडा घातला.

कॅशलेसच्या नावाखाली ५० हजाराला गंडा
युसूफवडगाव : ‘तुमचे एटीएम बंद पडले आहे. कॅशलेस व्यवहारासाठी एटीएम क्रमांक सांगा’, असा बहाणा सांगून एका भामट्याने बँक अधिकारी असल्याचे भासवत शेतकऱ्याला ५० हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना बुधवारी सावळेश्वर पैठण येथे घडली.
दादोबा हरिदास चौधरी (रा. सावळेश्वर पैठण) असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते बुधवारी शेतीकामात व्यस्त होते. यावेळी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात व्यक्तीने मी केज येथील आयडीबीआय बँकेतून बोलत आहे. एटीएमचा डिजिटल क्रमांक घेऊन उद्यापासून कॅशलेस व्यवहार करा, असे सांगून त्याने त्यांना विश्वासात घेतले. शेतकऱ्याने एटीएम क्रमांक सांगताच काही वेळाने त्यांच्या खात्यातील ५० हजार रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. त्यांनी बँकेत खात्री केली तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक राहुल देशपांडे करीत आहेत. (वार्ताहर)