५० लाखांचा निधी चार वर्षांपासून पडून
By Admin | Updated: January 22, 2015 00:42 IST2015-01-22T00:34:47+5:302015-01-22T00:42:54+5:30
संजय कुलकर्णी , जालना जिल्हा परिषदेच्या ३५ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीसाठीचा ५० लाखांचा निधी गेल्या चार वर्षांपासून पडून असून मुदत संपल्यानंतर देखील कामे पूर्ण न झाल्याने

५० लाखांचा निधी चार वर्षांपासून पडून
संजय कुलकर्णी , जालना
जिल्हा परिषदेच्या ३५ प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीसाठीचा ५० लाखांचा निधी गेल्या चार वर्षांपासून पडून असून मुदत संपल्यानंतर देखील कामे पूर्ण न झाल्याने ही कामे रद्द करण्याच्या हालचाली शिक्षण विभागामार्फत सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यात २०११ ते २०१३ या कालावधीतील ८५ कामे अपूर्ण आहेत. मात्र त्यापैकी काही कामांची मुदत आणखी शिल्लक असल्याने ती सुरू आहेत.
मात्र ३५ कामांची मुदत संपून देखील ती पूर्ण झालेली नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून वारंवार घेतल्या जाणाऱ्या आढावा बैठकीत कामे प्रगतीपथावर असल्याचे दर्शविण्यात येते. मात्र त्याचे काम कोठपर्यंत झालेले आहे, याची माहिती नसते. त्यामुळे कामे सुरू झाली किंवा नाहीत, हा देखील प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झालेला आहे.
शिक्षण विभागाच्या मंगळवारी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत हा मुद्दा समोर आल्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनाही याबाबतचे उत्तर देता आले नाही.
या कामांमध्ये जालना तालुक्यातील १, बदनापूर २, भोकरदन ४, मंठा ९, परतूर १०, घनसावंगी ५, अंबड ३ आणि जाफराबाद तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे. ३० हजारांपासून १ लाख ८० हजार रुपयांपर्यंतचा निधी या शाळांमधील वर्गखोल्या दुरूस्तीसाठी देण्यात आलेला आहे. मात्र संबंधित ग्रामपंचायतींनी अद्याप कामे पूर्ण केलेली नाहीत.
या कामांमध्ये नायगावतांडा, पाटोदा, एरंडवडगाव, लक्ष्मणनगर, मात्रेवाडी, कडेगाव, पोखरी, मेहगाव, करजगाव, बाभूळगाव, लोणगाव, विटा नं. १, सावरखेडा टाकळी, देवठाणा उस्वद, कठोळा खु., कानफोडी, कानफोडी तांडा, श्रीराम तांडा, पेवा, अंभोडा कदम, माहोरा, गोळेगाव, वरफळ, हातडी, फुलवाडी, लोणी, पळसी, ब्राह्मणवाडी, अकोली, लिखितपिंप्री, सुरूमगाव, मुढेगाव, गाढेसावरगाव, घनसावंगी, घोन्सी, लासुरा, काटखेडा, खडकेश्वर, घोडेगाव इत्यादी शाळांचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडून २०११-१२ व २०१२-१३ अंतर्गत या शाळांच्या वर्गखोल्या दुरूस्तीसाठी निधी मिळाला होता. दोन वर्षात काम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबत अनास्था दाखविल्याने ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.