औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५० कूल कॅब देणार सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:03 IST2018-04-05T18:00:01+5:302018-04-05T18:03:23+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे पर्यटक आणि प्रवाशांना लवकरच कूल कॅब टॅक्सीने प्रवास करता येणार आहे.

औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५० कूल कॅब देणार सेवा
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे पर्यटक आणि प्रवाशांना लवकरच कूल कॅब टॅक्सीने प्रवास करता येणार आहे. आरटीओ कार्यालयातर्फे ५० कूल कॅब टॅक्सी परवाने देण्यात येणार असून, मराठवाड्यातील पहिला परवाना बुधवारी देण्यात आला.
चिकलठाणा विमानतळ ते शहरातील विविध पर्यटनस्थळे, औद्योगिक वसाहतींमधील मार्गावर पर्यटक, प्रवाशांची ने-आण करण्यासाठी कू ल कॅब टॅक्सी योजना ठरावीक अटी व शर्तीची पूर्तता करून परवाने मंजूर करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतला. निर्णयानुसार प्रायोगिक तत्त्वावर ५० कूल कॅब टॅक्सी परवाने देण्यात येणार आहे. चिकलठाणा विमानतळावर उतरल्यानंतर पुढील प्रवासासाठी खाजगी टॅक्सी उपलब्ध आहे. पुणे, मुंबई विमानतळावर कूल कॅब कारची सुविधा आहे. औरंगाबादेतही अशी सुविधा असावी, यासाठी सुशिक्षित बेरोजगार गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत होते.
प्राधिकरणाने कूल कॅब टॅक्सीला हिरवा झेंडा दाखविला . आरटीओ कार्यालयाकडून बुधवारी पंकज सोनवणे यांना पहिल्या कूल कॅबचा परवाना सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या हस्ते देण्यात आला़ यावेळी प्रशिक्षणार्थी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश लाहोटी उपस्थित होते़