बँक व्यवस्थापकाने केला पाच लाख रूपयांचा अपहार
By Admin | Updated: October 29, 2014 00:43 IST2014-10-29T00:25:48+5:302014-10-29T00:43:31+5:30
कुंभारपिंपळगाव : बँक आॅफ महाराष्ट्रच्या कुंभारपिंपळगाव (ता.घनसावंगी) शाखेत व्यवस्थापकाने ग्राहकाच्या बँक खात्यातून ५ लाख ३ हजार २२९ रूपयांचा अपहार केला.

बँक व्यवस्थापकाने केला पाच लाख रूपयांचा अपहार
कुंभारपिंपळगाव : बँक आॅफ महाराष्ट्रच्या कुंभारपिंपळगाव (ता.घनसावंगी) शाखेत व्यवस्थापकाने ग्राहकाच्या बँक खात्यातून ५ लाख ३ हजार २२९ रूपयांचा अपहार केला. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दखल घेतली नसल्याने सदर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाने घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यापारी गोविंद व्यंकटेश जायभाये यांच्या प्रेम मोटर्स अॅण्ड अॅटोमोबाईल्स या व्यवसायिक प्रतिष्ठानचे या बँकेत खाते आहे. या खात्यावर आॅगस्ट २०१४ मध्ये ५ लाख ३८ हजार २६४ रूपयांची रक्कम जमा होती. मात्र २५ आॅगस्ट रोजी बँक खात्यातील रकमेची चौकशी केली असता खात्यावर केवळ ३५ हजार ३५ रूपयेच जमा असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे आपल्या खात्यावरून ५ लाख ३ हजार २२९ रूपये गायब झाल्याचे त्यांनी बँकेच्या निदर्शनास आणून दिले. मात्र या शंकास्पद व्यवहाराची काहीच माहिती मिळत नसल्याने जायभाये यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे घनसावंगी न्यायालयात फौजदारी प्रक्रीया संहिता १५६ (३) नुसार खाजगी खटला दाखल केला. दरम्यान या प्रकरणी कुंभारपिंपळगावसह तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, चर्चेला उधाण आले आहे. जायभाये यांनी न्यायालयात आपली बाजू मांडून बँकेच्या व्यवस्थापकाने गैरव्यवहार केल्याचे सांगितले. न्यायालयाने सदर प्रकरणात महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक रमेश प्रेमचंद भानारकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर घनसावंगी जमादार जी.जी. मदन यांनी भादंवि कलम ४०९, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला. तपास सहायक निरीक्षक सोनवणे करीत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली नाही. (वार्ताहर)