४८ लाखांची योजना पाच वर्षानंतरही अपुरी
By Admin | Updated: July 17, 2014 00:26 IST2014-07-17T00:08:20+5:302014-07-17T00:26:27+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी गावच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून ४८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला २००९ साली मान्यता मिळाली खरी़ परंतु, पाच वर्षांचा कालावधी लोटला

४८ लाखांची योजना पाच वर्षानंतरही अपुरी
विठ्ठल भिसे, पाथरी
गावच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून ४८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला २००९ साली मान्यता मिळाली खरी़ परंतु, पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी पाणीपुरवठा समिती आणि ग्रामपंचायतीच्या बेबनावामुळे योजना अद्यापही अपूर्ण आहे़ त्यातच तत्कालीन ग्रामसेवकाने १ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केल्यामुळे या योजनेला शेवटची घरघर लागली आहे़ तक्रारी पुढे आल्यानंतर आता पंचायत समितीकडून चौकशी सुरू झाली असली तरी यातून फारसे बाहेर काही येईल, असे मात्र दिसत नाही़
भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील फुलारवाडी ग्रामपंचायतीला २००९ साली जवळपास ४८ लाख रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली़ योजना मंजूर झाल्यानंतर गावस्तरावर समिती स्थापन झाली आणि शासनाकडून या ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्यात आला़
योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ लाख ५१ हजार ३५५ आणि तिसऱ्या टप्प्यात २१ लाख ३१ हजार ४३० रुपयांचे अंदाज पत्रक मंजूर करण्यात आले़
या समितीला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात २२ लाख ९४ हजार ६६५ रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात १४ लाख ४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला़ वितरित करण्यात आलेल्या निधीतून पाणीपुरवठा समितीने विहिरीचे बांधकाम, स्वीच रुम, विजेचे कनेक्शन आणि टाकीपर्यंत पाईपलाईन ही कामे करण्यात आली़
त्यानंतर समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याने काम रखडले गेले़ त्यातच ग्रामसेवकानेही समितीच्या या वादाचा फायदा घेऊन उपलब्ध झालेला निधी स्वत:च्या खात्यात वर्ग करून या निधीचा अपहार केला़ योजनेला पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी योजनेचे काम अद्यापही पूर्ण आहे़ टाकीपासून गावापर्यंत पाईपलाईन आणि गावातील वितरण व्यवस्थेची पाईपलाईन ही कामे अपूर्ण आहेत़ समिती ग्रामपंचायतीकडे पैसे मागत आहे व ग्रामपंचायत पैसे देण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा समितीचा आरोप आहे़ त्यामुळे ही योजना पाच वर्षानंतरही रखडून पडल्याचे दिसून येत आहे़
योजनेच्या कामाची चौकशी
पाणीपुरवठा योजनेतील काम अपूर्ण राहिल्याने पंचायत समिती प्रशासनाकडून या कामाची चौकशी सुरू करण्यात आली आहे़ ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा समितीतील वाढलेला वाद मिटविण्यासाठी १५ जुलै रोजी गटविकास अधिकारी स्वप्नील चव्हाण यांच्या दालनामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवकाची बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला़ गावामध्ये ग्रामसभा घेऊन समितीला देणे असलेला निधी वर्ग करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या़
पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत फुलारवाडी येथे मंजूर झालेल्या या योजनेच्या कामाकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे सद्यस्थितीत काम खोळंबून पडले आहे़ यामुळे या योजनेवर शासनाचा ३६ लाख रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना मात्र योजनेचे पाणी मिळत नाही़ पाणीपुरवठा विभागाने याकडे वेळीच लक्ष दिले असते ही येजना वेळेच्या आत पूर्ण झाली असती़
विस्तार अधिकारी हात हलवत परतले
ग्रामसेवकाने १ लाख १५ हजार रुपयांची रक्कम समितीला परत न देता ती स्वत:च्या खात्यामध्ये जमा करून वेगवेगळ्या तारखेला उचल केली़ तक्रार येताच आठ महिन्यानंतर ही रक्कम खात्यात भरणा केली़ या बाबत चौकशी करण्यासाठी गेलेले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण मात्र ग्रामपंचायत आणि समितीकडे दप्तर उपलब्ध नसल्याने हात हलवत परत आले आहेत़
समितीकडील दप्तर तांत्रिक सेवा पुरवठादाराकडे दिले असल्याची माहिती तपासणी अधिकारी चव्हाण यांनी प्रतिनिधीला दिली़