४७ हजार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा
By Admin | Updated: June 26, 2017 00:14 IST2017-06-26T00:13:53+5:302017-06-26T00:14:59+5:30
नांदेड: दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचे जवळपास २२० कोटींचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे़

४७ हजार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा
शिवराज बिचेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्ह्यात आजघडीला अडीच लाख शेतकऱ्यांवर दीड हजार कोटींचे कर्ज आहे़ शनिवारी राज्य शासनाने दीड लाख रुपयापर्यंत कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली आहे़ या घोषणेचा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज असलेल्या ४७ हजार २७७ शेतकऱ्यांचे जवळपास २२० कोटींचे कर्ज माफ होऊन सातबारा कोरा होणार आहे़
कर्जमाफी, हमीभाव यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरात शेतकरी १ जूनपासून संपावर गेला होता़ या आंदोलनाची शासनाने गंभीर दखल घेत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला़ त्यामध्ये कर्जमाफीसंदर्भात काही निकषही घालण्यात आले़ सरसकट सर्वच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाल्यास जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार होता़ अडीच लाख शेतकऱ्यांवर विविध बँकाचे दीड हजार कोटींचे कर्ज होते़ सुरुवातीला या सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होवून सातबारा कोरा होणार अशी भावना झाली होती़, परंतु शनिवारी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबतचे निकष स्पष्ट केले़ त्यानुसार दीड लाख रुपयापर्यंतचे सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे़
परंतु दीड लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असल्यास शेतकऱ्यांना अगोदर त्या वरच्या कर्जाची परतफेड केल्यासच दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे़ जिल्ह्यात दीड लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४७ हजार २७७ एवढी आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांचे सर्वच कर्ज माफ होवून त्यांचा सातबारा कोरा होणार आहे़
तर दीड लाखांपेक्षा काही हजारांनी जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ हजार ३८२ आहे़ त्यामुळे या शेतकऱ्यांना थोडीफार परतफेड करुनही आपला सातबारा कोरा करता येणार आहे़ तर दोन लाखांपेक्षा अधिकचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे़ त्यांनीही वरच्या कर्जाची परतफेड करुन दीड लाख रुपये माफीचा लाभ मिळणार आहे़ कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात महिन्याला आतापर्यंत सरासरी पाच आत्महत्या होत होत्या़ आता सातबारा कोरा होणाऱ्या शेतकऱ्यांना आगामी काळात कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे़