सफाई कर्मचाऱ्यांना ४७ लाखांना गंडविले
By Admin | Updated: June 26, 2017 00:52 IST2017-06-26T00:47:31+5:302017-06-26T00:52:08+5:30
औरंगाबाद : सफाई कर्मचाऱ्यांना वेतन न देता २०१२-१६ या कालावधीत ४७ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

सफाई कर्मचाऱ्यांना ४७ लाखांना गंडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आमखास मैदान येथील शासकीय कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यापासून शासनाच्या नियमानुसार आणि किमान वेतन कायद्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांना वेतन न देता २०१२-१६ या कालावधीत ४७ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
कंत्राटदार विलास त्रिभुवन आणि लायसन्सधारक सुंदर अप्पाराव सदाफु ले (रा.भावसिंगपुरा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, शासकीय कॅ न्सर रुग्णालयाचे स्वच्छतेचे काम करण्यासाठी शासनाने निविदा मागविल्या होत्या. यात सुंदर सदाफुले यांची निविदा मंजूर होऊन एजन्सीला ५० कर्मचारी पुरविण्याचे कंत्राट दिले होते. यानंतर सदाफुले यांनी त्यांना मिळालेले कं त्राट परस्पर विलास त्रिभुवन यांना दिले. २०१२-१६ या कालावधीत त्रिभुवन यांचे ५० कर्मचारी या रुग्णालयात स्वच्छतेचे काम करीत होते.
यापैकी मीराबाई हरिदास चंदनशिवे (रा.विश्वासनगर, लेबर कॉलनी) या २०१३-१६ या कालावधीत सफाई कामगार म्हणून कामाला होत्या. त्यांना २०१३ मध्ये प्रती दिन १३५ रुपये, २०१४ मध्ये प्रती दिन १४० रुपये, २०१५ ते २०१६ यावर्षी प्रती दिन १५० रुपये हजेरीप्रमाणे वेतन दिले. तसेच शेवटी काही महिने १६७ रुपये मजुरी दिली. नियमानुसार कामगाराला सुट्यांचे वेतनही दिले नाही. या कामगारांकडून रोज दहा ते बारा तास काम करून घेतले जात असे. सुंदर कन्स्ट्रक्शन या फर्मला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून कॅन्सर हॉस्पिटलला ५० सफाई कामगारांचा पुरवठा करण्यासाठी दरमहा ४ लाख ८०० रुपये मिळत होते. शासकीय रुग्णालयाशी केलेल्या करारानुसार वेतन न देता गुत्तेदार त्रिभुवन यांनी मीराबाई चंदनशिवे यांना दरमहा ३ हजार ५०० रुपये आणि ४ हजार ५० रुपये वेतन दिले. तसेच कमी पगाराविषयी त्यांनी विचारणा करताच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. अशाच प्रकारे आरोपींनी अन्य कामगारांनाही नियमानुसार वेतन न देता ४७ लाख ८६ हजारांची फसवणूक केली.
संगीता शिरसाट, छाया आठवले, वनिता वाहूळ, अनिता वाघ, उषा बिरारे, प्रमोद नाडे, संतोष बिरारे, महेंद्र मिसाळ, श्रीकांत बनसोडे, श्रीधर ढापसे, माया हिवराळे, विमल बनसोड, नीता सुरडकर, सुनीता मिसाळ, सुनील गंगावणे, प्रकाश जाधव, आनंद सुरडकर, अभिजित बनसोडे, अमोल सुरडकर, अमित भालेराव या कर्मचाऱ्यांनीही पोलिसांत तक्रार नोंदविली.