४७ क्रशरला ठोकले सील
By Admin | Updated: March 30, 2015 00:43 IST2015-03-30T00:35:05+5:302015-03-30T00:43:27+5:30
बाळासाहेब जाधव ,लातूर जिल्ह्यातीेल अवैध गौण खनिजात गौडबंगाल आहे. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाश टाकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ४७ क्रशरला सील ठोकण्यात आले आहे

४७ क्रशरला ठोकले सील
बाळासाहेब जाधव ,लातूर
जिल्ह्यातीेल अवैध गौण खनिजात गौडबंगाल आहे. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे यावर प्रकाश टाकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ४७ क्रशरला सील ठोकण्यात आले आहे. तसेच देवणी तालुक्यातील एक मंडळ अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात गौण खनिजाचा उपसा करणाऱ्या थकबाकीदार माफियाविरुद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तहसीलदारांनी हाती घेतली आहे़ लातूर जिल्ह्यातील ९१ परवानाधारक खडी केंद्रापैकी ४७ खडी केंद्रे थकबाकीअभावी सील करण्यात आलेली आहेत़ तर अवैध असलेले १६ खडीकेंद्रही सील करण्यात आली आहेत़ ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्तमालिका प्रकाशित करताच संबंधित वाळूमाफिया व क्रशरमाफियाने थकबाकी भरणे सुरु केले़ यामध्ये दंडात्मक कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या देवणी तालुक्यातील मंडळ अधिकारी व निलंगा, लातूर तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे जिल्ह्यातील दहाही तहसीलदार सतर्क झाले. त्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांना दंडात्मक कारवाईचे आदेश दिले़ तसेच थकबाकी न भरणाऱ्या वाळू, मुरुम माफिया व खडी केंद्रांवरील कारवाई करण्याचे आदेश दिल्याने कारवाईला गती आली आहे़ लातूर तालुक्यातील २६ खडी केंद्रापैकी १० खडीकेंद्र थकबाकीअभावी सीलबंद करण्यात आले़ औसा तालुक्यातील १५ पैकी ११, रेणापूर तालुक्यातील ४ पैकी २, निलंगा ५ पैकी ३, शिरुर अनंतपाळ १, देवणी ५ पैकी ४ उदगीर ५, जळकोट १, अहमदपूर १२ पैकी ४, चाकूर तालुक्यातील १० पैकी ६ अशा एकूण ४७ खडी केंद्रावर थकबाकी न भरल्याने सील करण्यात आले आहेत. तर उर्वरित खडी केंद्रवाल्याकडून ३८ लाख ९० हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. शिवाय, ५८ वाळूघाटापैकी ४ टप्प्यात झालेल्या ११ वाळू घाटाच्या लिलावातून ४६ लाख ९९ हजार ४४० रुपयाची वसुली करण्यात आली़ या वसुलीमुळे लातूर जिल्ह्याचे उद्दिष्टे ७६ टक्क्यांवर गेले आहे़ आजतागायत १५ कोटी २८ लाख रुपयांची वसुली झाली आहे़