४६५ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले
By Admin | Updated: June 30, 2017 23:45 IST2017-06-30T23:42:49+5:302017-06-30T23:45:39+5:30
बोरी : जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील ४६५ शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान बोरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्राप्त झाले आहे.

४६५ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी : जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील ४६५ शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान बोरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्राप्त झाले आहे. परंतु, सहा महिने उलटले तरी अनुदान वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील ४६५ शेतकऱ्यांसाठी १३ लाख ३७ हजार ४५१ रुपयांचे दुष्काळी अनुदान मंजूर झाले आहे. तहसील कार्यालयाने या रकमेचा धनादेश बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिला आहे. धनादेश देऊन सहा महिने होत असले तरी बँकेने शेतकऱ्याला दुष्काळी अनुदानाची रक्कम वाटप केलेली नाही.
सध्या पेरणी सुरू असून शेतकरी खते, बियाणे घेण्यासाठी रकमेची जुळवाजुळव करीत आहेत. खात्यावर पैसे असूनही रक्कम हातात पडत नसल्याने बी बियाणे कसे खरेदी करायचे याची चिंता लागली आहे. बँकेमध्ये शेतकरी चकरा मारीत आहेत.
यासंदर्भात सुभाषराव अंभुरे यांनी तहसीलदारांकडे निवेदनही सादर केले आहे. याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.