भूममध्ये ४६ जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2017 00:19 IST2017-02-08T00:16:05+5:302017-02-08T00:19:48+5:30
भूम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती गणातून २९ तर जिल्हा परिषद गटातून १७ जणांनी अशी एकूण ४६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे़

भूममध्ये ४६ जणांची माघार
भूम : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती गणातून २९ तर जिल्हा परिषद गटातून १७ जणांनी अशी एकूण ४६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे़ तर पंचायत समितीच्या दहा गणात ४४ तर जिल्हा परिषदेच्या चार गटात १८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ पाथरुड गटातून छाननी दरम्यान काँगेसच्या मनीषा फाळके यांचा अर्ज बाद झाला होता़ त्यांनी न्यायालयात धाव घेतल्याने पाथरुड गटाची अर्ज माघार घेण्याची तारीख दिनांक १० फेब्रुवारीपर्यंत वाढून देण्यात आली आहे़
भूम तालुक्यातील सुकटा गटात पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सुकटा गटात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादीत तिरंगी सामना होत आहे़ ईट गटातून तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात आहेत़ वालवड गटात चार जणांनी माघार घेतल्याने चौरंगी लढत होत आहे़ आष्टा जिल्हा परिषद गटातून सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे़ तर इथे तिरंगी लढत होत असून, सहा जण निवडणूक रिंगणात आहेत़ पंचायत समितीच्या दहा जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत़ पाथरुड गणातून एकाने माघार घेतल्याने या गणात चौरंगी लढत होत आहे़ आंबी गणातून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत़ इथे राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपात तिरंगी लढत होत आहे़ वालवड गणातून तिघांनी माघार घेतली आहे़ त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे़ चिंचोली गणातून चौघे निवडणूक आखाड्यातून बाहेर पडले आहेत़ इथे राष्ट्रवादी, शिवसेना, एक अपक्ष अशी लढत होत आहे़ आष्टा गणातून तिघांनी माघार घेतली असून, इथे पंचरंगी लढत होत आहे़ माणकेश्वर गणातून तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे़ इथेही पंचरंगी लढत होत आहे़ ईट गणातून केवळ एकाने माघार घेतली आहे़ तर इथे चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे़ पखरूड गणातून चार उमेदवारांनी अर्ज निवडणुकीतून माघार घेतली आहे़ इथेही पंचरंगी लढत होणार आहे़ सुकटा गणातून चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे़ या गटात मात्र, प्रमुख पक्षासह इतर असे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ आरसोली गणातून तीन उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने या गणात पंचरंगी लढत होत आहे़