किनवटमध्ये ४५ ग्रा़प़ंची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:19 IST2016-03-14T00:09:28+5:302016-03-14T00:19:56+5:30
गोकुळ भवरे, किनवट माहे मे-आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या किनवट तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहे़

किनवटमध्ये ४५ ग्रा़प़ंची निवडणूक
गोकुळ भवरे, किनवट
माहे मे-आॅगस्ट २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या किनवट तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहे़ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने भर उन्हाळ्यात निवडणुकीचे वातावरण तापणार आहे़
गोकुंदा, मांडवी, उमरी (बा़), बोधडी बु़ यासह काही मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने गावपातळीवर आपआपले पॅनल तयार करण्यात गावातील पुढारी कामाला लागल्याचे चित्र आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करतानाच अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडणे व शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्याने अनेक इच्छुकांची मात्र पंचाईत होणार आहे़
१८ मार्च २०१६ रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोटनियम २ नुसार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे़ २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशन पत्रे मागविणे व सादर केली जाणार आहे़ ४ एप्रिल रोजी छाननी, ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, १७ एप्रिल प्रत्यक्षात मतदान होणार आहे़ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवर कोणता उमेदवार कोण्या वॉर्डात ठेवायचा यासाठी गावातील पुढारी कामाला लागले आहेत़ काही गावांत बिनविरोध ग्रामपंचायती कशा निघतील यासाठीही प्रयत्न सुरु आहेत़
काही ग्रामपंचायतीत सर्वसाधारण लोकसंख्या असतानाही सर्वच प्रभाग आरक्षित जागा ठेवल्याने सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांच्या आशेवर विरजन पडले आहे़ त्यामुळे ‘तुम लढो हम साथ है’ म्हणण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे़ असाच प्रकार गोकुंदा ग्रामपंचायतीत झाल्याचे काही पुढाऱ्यांनी बोलून दाखविले़ माहे एप्रिल महिन्यात निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती याप्रमाणे- आमडी, मांडवी, उमरी बा़, थारा, नागापूर, सिरपूर, कुपटी खु़, लोणी, परोटी, प्रधानसांगवी, कमठाला, सिंगारवाडी, मोहपूर, येंदापेंदा, डोंगरगाव (चि़), दिग्रस, माळबोरगाव, वझरा बु़, सिगी मो़, बोधडी बु़, नागझरी, जलधरा, धानोरा सी़, गौरी, पाथरी, घोटी, मांडवा (कि़), तल्हारी, राजगड, सावरगाव, सिंगोडा, गोकुंदा, आंदबोरी (चि़), चिंचखेड, कनकी, कोठारी (सी़), जवरला, कोपरा, सावरी, राजगडतांडा, निचपूर, कोल्हारी, पिंपळगाव (सी़), मानसिंगनाईकतांडा अशा एकूण ४५ ग्रामपंचायतीचा समावेश आहे़
आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले आहे़ शौचालय वापरा बाबतचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केल्याने ज्याच्याकडे शौचालय नाही अशा इच्छुकांना मात्र निवडणूक लढविणे अवघड बनले आहे़ तर जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र नसणारे आरक्षित जागेवर निवडणूक लढवू पाहणाऱ्यांची मोठी गोची होणार आहे़
किनवट शहराला लागून असलेल्या मिनी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुंदा ग्रा़ पं़ त शेख सलीम शे़मदार यांच्या नेतृत्वात पॅनल उभे करून १७ जागांवर उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याची तयारी शेख सलीम यांनी दर्शविली आहे़ एकूणच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने तालुक्यातील वातावरण ढवळून निघणार आहे़ सध्यातरी मोर्चेबांधणी जोमात आहे़