४४६ शाळा संरक्षक भिंतीविना
By Admin | Updated: May 8, 2014 23:30 IST2014-05-08T23:27:32+5:302014-05-08T23:30:07+5:30
उस्मानाबाद : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळेने दहा निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

४४६ शाळा संरक्षक भिंतीविना
उस्मानाबाद : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळेने दहा निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ४६६ शाळांना आजही संरक्षक भिंती नसल्याने अशा शाळांचा परिसर मोकाट जनावंरासाठी कुरण बनला आहे. त्याचप्रमाणे २८३ शाळांमध्ये कीचन शेडच नसल्याने पोषण आहार उघड्यावर शिजविण्याची वेळ सर्व संबंधितांवर ओढावली आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेला पक्की इमारत, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, प्रत्येक शिक्षकासाठी एक वर्गखोली, अपंगाकरिता रॅम्पची सोय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, पाणी, कीचनशेड, संरक्षक भिंत आणि क्रीडांगण या दहा भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे. गतवर्षी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. ही बाब शासनाने गांभिर्याने घेतल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांनी युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करुन घेतली होती. त्यामुळेच यावेळी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १ हजार १२९ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण होवू शकली. असे असले तरी अन्य निकष मात्र शंभर टक्के शाळांनी पूर्ण केल्याचे दिसत नाही. मध्यंतरी बिहारसह काही राज्यात पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी जिल्ह््यातील शाळांच्या कीचनशेडचा प्रश्न ऐरणीवर आला होता. काही दिवस यावर चर्चा झाली. उपाययोजना करण्याचे ठरले. मात्र हा प्रश्न कालांतराने मागे पडला. त्यामुळेच की काय आजही जिल्ह्यातील २८३ शाळांमध्ये कीचनशेडची सुविधा नाही. तसेच एका शाळेला इमारत नाही. मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली बंधनकारक आहे. असे असले तरी २११ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे २१० शिक्षकांसाठी स्वतंत्र वर्ग खोली नाही. (प्रतिनिधी) वर्गामध्ये जाताना अपंगांना त्रास होऊ नये, म्हणून प्रत्येक शाळेला रॅम्प बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आजही ४६ शाळांमध्ये रॅम्पची सुविधा नाही. ८ शाळांमध्ये मुलींसाठी तर ४ शाळांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह बांधलेले नाही. एका शाळेला क्रीडा मैदान नाही.