४४३८ कर्मचाऱ्यांची नेमणूक
By Admin | Updated: October 13, 2014 23:34 IST2014-10-13T23:13:04+5:302014-10-13T23:34:02+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील तिन्हीही मतदारसंघात ९७२ मतदार केंद्रांसाठी ४ हजार ४३८ प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले आहेत.

४४३८ कर्मचाऱ्यांची नेमणूक
हिंगोली : जिल्ह्यातील तिन्हीही मतदारसंघात ९७२ मतदार केंद्रांसाठी ४ हजार ४३८ प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले आहेत. प्रत्येक केंद्रावर चार कर्मचाऱ्यांसह एक पोलिस तैैनात राहणार आहे. संवेदनशील १४ केंद्रांवर २ पोलिसांसह एक सुक्ष्म निरीक्षक नेमण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांची तीन विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली. प्रत्येक मतदारसंघ दोन तालुक्यात विभागला गेला. जिल्ह्यात ९७२ पैकी संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या आहे. वसमतमध्ये ३१४ केंद्रांसाठी २२ बसेस, १९ मिनी बसेस आणि ५६ जीप मिळून ९१ वाहनांद्वारे मतपेट्या नेण्यात येणार आहेत. कळमनुरीत ३३६ केंद्रांची संख्या असल्याने ९० वाहने तयार ठेवली आहेत. २५ बसेस, ८ मिनी बसेस आणि ५७ जीपचा त्यात समावेश आहे. हिंगोलीत २७ बसेस, ११ मिनी बसेस आणि ५१ जीपद्वारे मतपेट्या पोहचती केल्या जातील. आगाराकडून बसेसची बुकींग करण्यात आली आहे. १४ आॅक्टोबर रोजी सकाळी तिन्हीही मतदारसंघातील ‘रिटर्निंग आॅफिसर’कडे २७१ वाहने सकाळी ८ वाजता सुपूर्द केली जाणार आहेत. लगेचच साहित्य व वाहनांची तपासणीनंतर ११ वाजल्यापासून ठरवलेल्या मार्गावरून ही वाहने संबंधीत केंद्रावर मतपेट्या घेऊन जातील. दुपारी १ वाजता शेवटचे वाहने निघून ३ पर्यंत सर्व केंद्रावर वाहने पोहोचतील. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान केंद्राधिकारी नेमण्यात आलेत. केंद्रावर १ पोलिस कर्मचारी तर संवेदनशील ठिकाणी २ पोलिसांची नेमणूनक करण्यात आली. जिल्ह्यातील हिंगोलीत ५ पैकी शहरात एक, वसमत ५ व कळमनुरी ४ केंद्रांवर मिळून १४ सुक्ष्म निरीक्षक नेण्यात आले आहेत. अचानक आलेल्या कामांसाठी देखील मनुष्यबळाची तयारी केली आहे. त्यासाठी साडेतीनशेच्या पुढे कर्मचारी राखीव ठेवले आहेत.
दुसरीकडे बंदोबस्तासाठी तीन पोलीस उपाधिक्षक, १७ निरीक्षक दर्जाचे अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी नेमले आहेत.
हिंगोली जिल्हा पोलीस दलातील ७० अधिकारी व ११०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सोमवारी पोलीस अधीक्षक एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. यात अप्पर पोलीस अधीक्षक राठोड, उपअधिक्षक पियुष जगताप, सुनील लांजेवार, निलेश मोरे, १२ पोनि, सपोनि ते फौजदार दर्जाचे ५४ अधिकारी, ११०० कर्मचारी, गृहरक्षक दलाचे ३६५ पुरूष व महिला कर्मचारी यांचा समावेश केलेला आहे. शिवाय पोलिस अधिकाऱ्यांचे पेट्रोलिंग राहणार आहेत. (प्रतिनिधी)