तहसीलच्या खात्यावर ४४ कोटींचा निधी
By Admin | Updated: March 1, 2016 23:53 IST2016-03-01T23:47:22+5:302016-03-01T23:53:41+5:30
परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला ४४ कोटी ६ हजार रुपयांचा निधी ९ तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

तहसीलच्या खात्यावर ४४ कोटींचा निधी
परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला ४४ कोटी ६ हजार रुपयांचा निधी ९ तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
परभणी जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम हातचे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. पिकांची आणेवारी ५० पैशापेक्षाही कमी निघाल्याने शासनाने शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा केली. खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीपोटी अर्थसहाय्य म्हणून यापूर्वी १११ कोटी ४१ लाख रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले होते. ही रक्कम प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाला ४४ कोटी ६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
२९ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने या मदतीचे वाटप तहसीलस्तरावर केले आहे. त्या त्या तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येनुसार प्राप्त रक्कम तहसीलदारांच्या खात्यात जमा करण्यात आली असून तहसीलस्तरावरुन महसूलची यंत्रणा ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. जिंतूर तालुक्याला सर्वाधिक ९ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून त्या खालोखाल परभणी तालुक्याला ८ कोटी ३२ लाख रुपये मिळाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील हे अनुदान असून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. (प्रतिनिधी)