शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसानीचे ४३,४२० दावे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST2021-09-27T04:04:37+5:302021-09-27T04:04:37+5:30
--- - कृषी विभाग : ४२,८९८ हजार सर्वेक्षण पूर्ण -विमा कंपनी : ५८ हजार सर्वेक्षणाचा दावा --- औरंगाबाद : ...

शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसानीचे ४३,४२० दावे रद्द
---
- कृषी विभाग : ४२,८९८ हजार सर्वेक्षण पूर्ण
-विमा कंपनी : ५८ हजार सर्वेक्षणाचा दावा
---
औरंगाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला होता. आतापर्यंत १ लाख ११ हजार ८५३ शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची माहिती (इंटिमेशन) कृषी विभाग, विमा कंपनीला दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४२ हजार ८९८ शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. तर ४३ हजार ४२० दावे फेटाळण्यात आले असून, २५ हजार ५३६ दाव्यांचे सर्वेक्षण अपूर्ण आहे. आतापर्यंत ५८ हजार दाव्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा विमा कंपनीकडून करण्यात आला आहे.
एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरंस कंपनीकडून प्रतिनिधींच्या मदतीने सर्वेक्षण प्रक्रिया सुरू असून, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुन्हा नुकसानीच्या सुमारे ७० हजारांवर माहिती आणखी शेतकऱ्यांकडून कंपनीकडे आली आहे. त्याची निश्चित आकडेवारी अद्याप कळाली नाही. अनेक ठिकाणी जमीन खरडून वाहून गेली. तर पीक विमा कवच असलेल्या शेतकऱ्यांसोबत विमा नसलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसान अधिक आहे. त्यांचे मदतीकडे लक्ष लागले आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ११ सप्टेंबर रोजी पुढील पाच दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील असे सांगितले होते. त्यानंतर १५ दिवस उलटले तरी अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. १५ ऑक्टोबर नंतर रब्बी हंगाम सुरू होईल. त्यामुळे त्याअगोदरच्या दाव्यांतील सर्वेक्षणाची आकडेवारी अंतिम असेल, असे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
--
आणखी ७० हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीची शक्यता
--
१.११ लाखांपैकी सुमारे ५८ हजार शेतांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. पुढील २ दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. रद्द झालेल्या ४३ हजार दाव्यांत एकाच शेतातील नुकसानीच्या २-३ इंटिमेशनचा समावेश होता. त्यामुळे तो आकडा अधिक वाढलेला दिसतो. या दाव्यांशिवाय आणखी इंटिमेशन सुरू असून, तो आकडा ७० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचे चित्र पुढीलच्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
-रामनाथ भिंगारे, पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक