छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रत्येक मोठ्या चौकात सकाळ-संध्याकाळ वाहतूककोंडी हमखास असतेच. वर्षानुवर्षे शहरवासीय या वाहतूककोंडीचा सामना करीत आहेत. वाहनधारकांची यातून कायमची सुटका व्हावी, असे कोणालाही वाटत नाही. वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून शहरात तब्बल ४३ चौकांमध्ये वाहतूक सिग्नल महापालिकेने बसविले. त्यासाठी जवळपास ६ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, वाहतूक पोलिस निम्म्याहून अधिक सिग्नलच बंद ठेवतात. कारण, काय तर पोलिस कर्मचाऱ्यांचा अभाव. दररोज सर्व सिग्नल सुरू ठेवले तर शहरात एकाही चौकात वाहतूककोंंडी होणारच नाही, असा दावा महापालिकेचा आहे.
सकाळी ९ ते ११ पर्यंत शहरातील मुख्य रस्ते वाहनांनी गजबजलेले असतात. प्रत्येकाला कार्यालयात, कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या कामासाठी जायचे असते. सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहनसंख्या दुपटीने वाढलेली असते. अशा वेळी चौकाचौकांत वाहतूककोंडी असते. या वाहतूककोंडीतून शहरवासीय दररोज मार्ग काढत घर गाठतात. जालना रोडवर, तर मनपाने सिंक्रोनाइज (एकाच वेळी काम करणारी यंत्रणा) पद्धतीने सिग्नल बसविले. नगरनाका येथून निघालेले एखादे वाहन कोणत्याही सिग्नलवर न थांबता मुकुंदवाडीपर्यंत जाऊ शकते. मात्र, जालना रोडवरील बहुतांश सिग्नल बंद असतात. गर्दीच्या वेळी वाहतूक सिग्नल सुरू ठेवले, तर चारही बाजूची वाहतूक थोड्या-थोड्या वेळाने निघून जाऊ शकते. मात्र, वाहतूक पोलिस कर्मचारी नाहीत, म्हणून बहुतांश सिग्नल बंद ठेवतात. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या सिग्नलला जंगली झाडे, वेलींनी वेढा घातला आहे.
एक स्मार्ट सिग्नल २० लाखांचेमहापालिकेने अलीकडेच शहरात १५ ठिकाणी स्मार्ट सिग्नलची उभारणी केली. एका सिग्नलचा खर्च २० लाख रुपये होता. ३ कोटी ३० लाख रुपये यावर खर्च करण्यात आले. जुन्या सिग्नलची संख्या २८ आहे. प्रत्येकी १० लाख रुपयांप्रमाणे २ कोटी ८० लाख रुपये खर्च झाले.
नवीन स्मार्ट सिग्नलचे ठिकाणहॉटेल कार्तिकी, समर्थनगर, सिल्लेखाना, रेल्वे स्टेशन, महानुभव आश्रम चौक, शहानुरमियाँ दर्गा चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल, उद्धवराव पाटील चौक, धूत हॉस्पिटल चौक, मुकुंदवाडी, केम्ब्रिज चौक, शरद हॉटेल चौक, टीव्ही सेंटर, वोखार्ड चौक.
जुने सिग्नल कोणत्या चौकातज्युब्लिपार्क, मिलकॉर्नर, महावीर चौक, नगरनाका, कोकणवाडी, जिल्हा न्यायालय, क्रांतीचौक, बीएसएनएल चौक, मोंढानाका, अमरप्रित, आकाशवाणी, एपीआय कॉर्नर, खंडपीठासमोर, वसंतराव नाईक चौक, एन-१, आंबेडकर चौक, एसबीओए चौक, जवाहरनगर चौक, सुतगिरणी चौक, रोपळेकर चौक, सिटी क्लब, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगपुरा, पंचवटी चौक, बजरंग चौक, चिस्तिया चौक, मिलिंद चौक, चंपा चौक.
पोलिसांनी वापर करावावाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार आजपर्यंत प्रत्येक चौकात सिग्नल उभारले. याचा वापर करण्याचे दायित्व वाहतूक पोलिसांचे आहे. बंद ठेवून काहीच उपयोग नाही. शंभर टक्के वाहतूक सिग्नल सुरू ठेवल्यास शहरात कुठेही वाहतूककोंडी होणार नाही.- मोहिनी गायकवाड, कार्यकारी अभियंता मनपा.