प्राध्यापकाच्या घरी ४३ हजारांची चोरी
By Admin | Updated: July 6, 2014 00:16 IST2014-07-05T23:58:27+5:302014-07-06T00:16:15+5:30
औंढा नागनाथ : येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राध्यापकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून ४३ हजार रुपयांचा ऐवज पळविला.

प्राध्यापकाच्या घरी ४३ हजारांची चोरी
औंढा नागनाथ : येथे पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्राध्यापकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारून ४३ हजार रुपयांचा ऐवज पळविला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या सर्तकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औंढा येथील नागनाथ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. साहेबराव देवकते हे आपल्या कुटुंबियासोबत हिंगोली- औंढा राज्य रस्त्यालगत असलेल्या आहिल्यानगरमध्ये राहतात. शुक्रवारी रात्री घरामध्ये उकाडा जाणवू लागल्याने देवकते कुटुंबियांनी कुलर लावले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा गेटमधून प्रवेश केला व दुसऱ्या बेडरुमच्या खिडकीचा लोखंडी व लाकडी दरवाजा वाकवून घरामध्ये प्रवेश केला. कपाटाचे दरवाजे वाकून लॉकर्समधील ७ ग्रॅम सोन्याचे कर्णफुल व ४ ग्रॅम सोन्याचे दोन मंगळसूत्र व मणी तसेच नगदी १० हजार रुपये रोख रक्कम असे अंदाजे ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना सकाळी लक्षात येताच प्रा. देवकते यांनी याची माहिती पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, सपोनि ज्ञानोबा कुटी, जमादार नुरखाँ पठाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्याच प्रमाणे चोरट्यांचा माग काढण्यासाठी हिंगोली येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते; परंतु हिंगोली-औंढा या रस्त्यापर्यंतच श्वानाने माग काढला.
‘एफआयआर’वरून संभ्रम
प्रा. देवकते यांच्या घरून चोरट्यांनी ४३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे; परंतु पोलिसांनी एफआयआरमध्ये सोने व रोख रक्कम मिळून १६ हजार रुपये चोरीला गेल्याचे नमूद केले आहे. म्हणजे ११ ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ६ हजार रुपये ऐवढीच पोलिसांनी गृहित धरली आहे. (वार्ताहर)