४१० महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी ठरल्या पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2017 23:26 IST2017-04-04T23:24:08+5:302017-04-04T23:26:04+5:30
जालना : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ४२ पोलीस शिपाई पद भरती प्रक्रिया सुरू आहे

४१० महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी ठरल्या पात्र
जालना : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ४२ पोलीस शिपाई पद भरती प्रक्रिया सुरू आहे. यात महिला उमेदवारांसाठी राखीव असलेल्या १३ जागांसाठी भरती प्रक्रियेला मंगळवारी येथील कवायत मैदानावर सकाळी सहा वाजता सुरूवात झाली.
महिला पोलीस शिपाई पदाच्या १३ जागांसाठी ९०० महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. मंगळवारी ४६९ महिला उमेदवार उपस्थित होत्या. त्यापैकी ४१० उमेदवार चाचणीसाठी पात्र तर ५८ अपात्र ठरल्याची माहिती पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी दिली.
पोलीस कवायत मैदानावर सकाळी सहा वाजता उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून उमेदवारांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये उमेदवारांची छाती मोजणी, ८०० आणि १०० मीटर धावणे, लांबउडी, गोळाफेक आदी मैदानी चाचणी घेण्यात आली. ४६९ उमेदवारांपैकी ४१० उमेदवार चाचणीसाठी पात्र ठरले. तर ५८ उमेदवार विविध चाचण्यात अपात्र ठरले आहेत. माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या ५ जागांसाठी ५२ उमेदवारांची यावेळी चाचणी घेण्यात आली. २२ मार्चपासून ४२ जागांसाठी सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरतीत आत्तापर्यंत ११२० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ८७६ उमेदवार विविध चाचण्यांना सामोरे गेले. त्यापैकी ७३२ उमेदवार मैदानीचाचणीसाठी पात्र ठरले आहेत. तर २३५ उमेदवार अपात्र ठरले आहेत आणि २४४ उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
उमेदवार संपूर्ण भरती प्रक्रियेवर ३२ पोलीस अधिकारी, १५० पोलीस कर्मचारी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. तसेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळू पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे
मंगळवारी झालेल्या महिला उमेदवारांच्या मैदानी चाचणीमध्ये महिला पोलिसांनी उमेदवारांची विविध तपासणी करून विविध प्रक्रिया पार पाडली. पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, अभय देशपांडे आदीसह महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी या भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते.