पथकासाठी ४१ लॅपटॉप
By Admin | Updated: June 4, 2014 01:35 IST2014-06-04T01:21:53+5:302014-06-04T01:35:02+5:30
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे.

पथकासाठी ४१ लॅपटॉप
औरंगाबाद : सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे. त्याअंतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. आजारी आढळणार्या विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केले जातात. आता हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तपासणी पथकातील डॉक्टरांसाठी ४१ लॅपटॉप उपलब्ध करण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केलेल्या कामाचा रोजचा अहवाल त्यांना आॅनलाईन वरिष्ठांना पाठवावा लागणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर रुग्णालयात उपस्थित राहत नाहीत, अशी तक्रार असते. डॉक्टरांनी मुख्यालयी राहावे यावरून सतत वाद होत असतात. या तक्रारींना लगाम घालण्यााठी शालेय आरोग्य तपासणी अभियान आॅनलाईन राबविण्याचा निर्णय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या संचालकांनी घेतला. त्यांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात ४१ पथके कार्यरत आहेत. या पथकातील डॉक्टरांना प्रत्येकी एक याप्रमाणे ४१ लॅपटॉप देण्यात येत आहेत. हे लॅपटॉप नुकतेच सामान्य रुग्णालयास प्राप्त झाले आहेत. याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड म्हणाले की, शालेय आरोग्य अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येते. या अभियानात विद्यार्थ्यांना हृदयरोग, किडनी विकार, डोळ्यांचे आजार, कान, नाक आणि घसा याविषयी आजार आढळतात. या मुलांना अभियानांतर्गत मोफत शस्त्रक्रिया, उपचार करण्याची तरतूद आहे. पथकाने रोज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची तपासणी करताना त्यांची नोंद लॅपटॉपमध्ये करावी, तसेच विद्यार्थ्यांना आढळलेल्या आजाराची माहिती लॅपटॉपच्या माध्यमातून तातडीने वरिष्ठ अधिकार्यांमार्फत पोहोचणार आहे. रुग्ण विद्यार्थांना तातडीने उपचार कोठे द्यावेत याचा निर्णयही गतीने घेतला जाईल. अभियान आॅनलाईन होणार असल्यामुळे कोणत्या पथकाने किती विद्यार्थ्यांची तपासणी केली याची माहिती रोजच्या रोज मुंबई, पुणे येथील वरिष्ठ अधिकार्यांना मिळणार आहे. लॅपटॉपची मुंबईतून खरेदी झाली असून त्यातील फिचर्स आणि अप्लिकेशन योग्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी हे सर्व लॅपटॉप शासकीय आयटीआयकडे पाठविण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी अभियानास सुरुवात होईल. त्याआधी पथकांना लॅपटॉप देण्यात येणार आहेत.