४० हजारांवर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ !
By Admin | Updated: August 22, 2014 00:58 IST2014-08-22T00:56:27+5:302014-08-22T00:58:50+5:30
उस्मानाबाद : अर्धाअधिक पावसाळा सरला असतानाही जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. आजघडील अडीचशेवर गावे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.

४० हजारांवर विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क होणार माफ !
उस्मानाबाद : अर्धाअधिक पावसाळा सरला असतानाही जिल्हाभरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. आजघडील अडीचशेवर गावे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पाण्याअभावी खरीप पिकेही हातातून चालली आहेत. सदरील भीषण स्थिती लक्षात घेवून शासनाने राज्यातील १२३ तालुक्यात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ केले जाणार आहे. याचा जिल्ह्यातील चाळीस हजारावर विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. आॅगस्ट महिना अर्धाअधिक सरला आहे. असे असतानाही जिल्ह्यातील अडीचशेवर गावे टंचाईचा सामना करीत आहेत. सर्वाधिक भीषण स्थिती भूम तालुक्यामध्ये पहावसाय मिळत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने आजही ३० टँकर एकट्या भूम तालुक्यात सुरू आहेत. पाण्याअभावी खरीप पिकांनाही फटका बसला आहे. परंडा तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झालेली नाही. एकूणच जिल्ह्यामध्ये टंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेवून शासनानेही राज्यातील १२३ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परस्थिती जाहीर केली आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. कृषीपंपाच्या वीज बिलामध्ये ३३ टक्के सवलत मिळणार असून शेतसाराही माफ केला जाणार आहे. त्याचप्रामणे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ करण्यात आले आहे. जिल्हाभरातील चाळीस हजारावर विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार आहे. वाशी वगळता अन्य सात तालुक्यांमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २४ हजार ८४४ इतकी आहे. यामध्ये परंडा तालुक्यातील २ हजार ०९, भूम २ हजार ६९, कळंब २ हजार ९७१, उस्मानाबाद ७ हजार ४७५, तुळजापूर ४ हजार ३४५, लोहारा १ हजार ७४० तर उमरगा तालुक्यातील ४ हजार ४३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी ३४० रूपये इतके शुल्क आकारले जाते. शासनाच्या या निर्णयामुळे तब्बल ८४ लाख ४६ हजार ९६० रूपये इतके शुल्क माफ होणार आहे. बारावीच्या वर्गामध्येही सात तालुक्यातील मिळून सुमारे १५ हजार ३७५ विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना चारशे रूपये तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांना ३६० रूपये परीक्षा शुल्क आकारले जाते. त्यामुळे याही विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्काचे तब्बल ५५ लाख रूपये माफ होणार आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्हाभरातील दहावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या चाळीस हजारावर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी) वाशी तालुक्यातही सरासरीच्या अत्यल्प पाऊस झालेला आहे. सध्या वीस पेक्षा अधिक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे आठ गावांत आठ टँकर सुरू आहेत. पिकांची स्थितीही अत्यंत बिकट आहे. असे असतानाही या तालुक्यामध्ये टंचाईसदृश्य स्थिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच दहावी आणि बारावीच्या वर्गातील १ हजार ६३१ विद्यार्थ्यांना फटका सोसावा लागणार आहे. मागील वर्षीही जिल्हाभरातील ६ हजार ६७ विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपुर्ती करण्यात आली होती. १८ लाख ६८ हजार ६०० रूपये इतकी रक्कम मंजूर झाली होती. भूम वगळता अन्य तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला होता. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने निधीही त्याच प्रमाणात लागणार आहे.