स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे, पण मुलाखतीसाठी एकच डाॅक्टर हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST2021-04-13T04:02:51+5:302021-04-13T04:02:51+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयासाठी स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे भरण्यासाठी सोमवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते; परंतु केवळ एकच डाॅक्टर ...

स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे, पण मुलाखतीसाठी एकच डाॅक्टर हजर
औरंगाबाद : घाटी रुग्णालयासाठी स्पेशालिस्ट डाॅक्टरांची ४० पदे भरण्यासाठी सोमवारी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते; परंतु केवळ एकच डाॅक्टर मुलाखतीला हजर राहिले. त्यामुळे घाटीला स्पेशालिस्ट डाॅक्टर मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने घाटीवर रुग्णसंख्येचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे. स्पेशालिस्ट डॉक्टर, स्टाफ नर्स आणि अन्य कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे घाटी प्रशासनाने इंटेसिव्हिस्ट, अॅनेथिसिस्ट, जनरल फिजिशियन, चेस्ट फिजिशियन यांची प्रत्येकी १० पदे, स्टाफ नर्सची १०० पदे आणि विविध संवर्गातील कर्मचारी, अशी एकूण १७७ पदे तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात थेट मुलाखतीद्वारे भरण्याचा निर्णय घेतला. स्पेशालिस्ट डॉक्टरांना प्रतिमहिना सव्वालाख रुपये वेतन देण्यात येणार आहे; परंतु या वेतनात कोणी काम करण्यास इच्छुक नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्याउलट ड्यूटी मेडिकल ऑफिसर या पदासाठी बीडीएस, बीएएमएस, ‘बीएचएमएस’ यांचे जागेपेक्षा अधिक अर्ज आले. स्टाफ नर्सच्या १०० पदांसाठी २० अर्ज आले. उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, डॉ. सिराज बेग आदींनी मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली. आता १६ एप्रिल आणि २० एप्रिल रोजीही याच पदांसाठी मुलाखती होणार आहेत. किमान तेव्हा तरी स्पेशालिस्ट डॉक्टर मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.