अधीक्षकांसह ४० पोलीस कर्मचारी जखमी

By Admin | Updated: June 6, 2014 01:03 IST2014-06-06T00:25:28+5:302014-06-06T01:03:33+5:30

बीड:केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यसंस्कारानंतर परळी येथे राडा झाला होता़

40 police personnel including Superintendants injured | अधीक्षकांसह ४० पोलीस कर्मचारी जखमी

अधीक्षकांसह ४० पोलीस कर्मचारी जखमी

बीड:केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यसंस्कारानंतर परळी येथे राडा झाला होता़ संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री व नेत्यांच्या गाड्या अडवून दगडांचा वर्षाव तर केलाच शिवाय हेलिपॅडपर्यंत पिच्छा करुन हेलिकॉप्टरवरच्या दिशेने दगडे भिरकावली़ या दगडफेकीत अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह ४० पोलिस जखमी झाले़
गोपीनाथराव मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परळीत मोठा जनसमुदाय उसळला होता़
यावेळी केंद्र व राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांनीही हजेरी लावली होती़ मुंडे यांचा मृत्यू अपघाताने झाला यावर कार्यकर्त्यांचा विश्वासच बसत नव्हता़ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच लावून धरली़
अत्यंत शोकाकुल वातावरणात मुंडे यांचा अंत्यविधी पार पडला़ त्यानंतर नेतेमंडळी बाहेर पडत होती़ यावेळी संतप्त जमाव नेत्यांच्या गाड्यांना आडवा झाला़ त्यानंतर वाहनांवर दगडफेक करुन नुकसान केले़ यावेळी काही नेत्यांना धक्काबुक्कीही झाली़ जमावाची दगडफेक चुकविण्यासाठी काही पोलिसांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या़ पोलिसांनी आपल्या वाहनातून सर्व नेत्यांना हेलिपॅडपर्यंत पोहोचविले़ जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला़
यावेळी एकच पळापळ उडाली़ दरम्यान, दगडफेकीत तब्बल ४० पोलिस कर्मचारी जखमी झाले़ त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनाही चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले़ जखमी पोलिस कर्मचार्‍यांवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले़
चार पोलिसांच्या डोक्याला इजा असल्याचे सूत्रांनी सांगितले़
दगडफेक करणारे कार्यकर्ते उसाच्या शेताजवळ जाऊन बसले होते़ त्यापैकी २० जणांना पोलिसांनी अटक केली.संजय राठोड, संदीप डिपके, सुधीर पाचांगे, अरविंद डिपके, सुभाष तेलंग (सर्व रा. पांगरी), शंकर भरडे (मलकानगर), प्रमोद मुंडे (दोघे रा. लिंबोटा), रविकिरण गावंडे (यवतमाळ), भरत शेळके (वझुर खुर्द), राजेश लटपटे (कोद्री) आदींचा समावेश आहे. त्या सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. याप्रकरणी परळी ग्रामीण ठाण्यात ६० जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
हेलिकॉप्टरवरही दगडफेक
संतप्त जमावाच्या तावडीतून पोलिसांनी नेतेमंडळींची सुटका करत त्यांना हेलिपॅडपर्यंत पोहोचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले़
यावेळी काही कार्यकर्त्यांनी या नेत्यांचा हेलिपॅडपर्यंत पिच्छा पुरविला़ त्यानंतर हेलिकॉप्टरच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली़
अधीक्षक रेड्डींनाही इजा!
दगडफेकीनंतर नेतेमंडळींना पोलिसांनी सुरक्षाकवच दिले़
यावेळी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी आपल्या हातावर तीन दगडे झेलले़ यात त्यांना मुका मार लागला़
तात्पुरते उपचार करुन ते पुन्हा कामामध्ये गर्क झाले. (प्रतिनिधी)
या नेत्यांची फजिती!
संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीने राजकीय नेत्यांची फजिती झाली़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आऱ आऱ पाटील, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, हर्षवर्धन पाटील या नेत्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले़ कार्यकर्त्यांचा संताप पाहून हे सर्व नेते भयभीत झाले़

Web Title: 40 police personnel including Superintendants injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.